किनगाव येथून पळालेले प्रेमीयुगुल सिरसाळ्यात ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

रतनलाल साळवी नावाच्या युवकाने गावातील एका सतरावर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून एक मे रोजी गावातून पळविले. त्याच्यावर तीन तारखेस किनगाव पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हाही नोंद करण्यात आला.

सिरसाळा (जि. बीड) -  किनगाव (ता. अहमदपूर, जि. लातूर) गावातील प्रेमीयुगुलास विवाह करून राजस्थानात पलायन करण्याच्या तयारीत असताना मोठ्या शिताफीने मंगळवारी (ता. १९) दुपारी चारच्या सुमारास सिरसाळ्यातून ताब्यात घेण्यात आले. 

तीन दिवसांपासून हे प्रेमीयुगुल सोनपेठ रोडवरील वीटभट्टीवर थांबले होते. अहमदपूर तालुक्यातील किनगाव गावातील भेळचा व्यवसाय असणाऱ्या रतनलाल साळवी नावाच्या युवकाने गावातील एका सतरावर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून एक मे रोजी गावातून पळविले. त्याच्यावर तीन तारखेस किनगाव पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हाही नोंद करण्यात आला.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

दरम्यान, त्या मुलाचे मोबाईल लोकेशन हे सिरसाळा दाखवत असल्याने किनगाव पोलिसांनी सिरसाळा पोलिसांशी संपर्क साधून सर्व प्रकार सांगितला. सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार विष्णू फड यांनी येथील सोनपेठ रस्त्यावरील एका वीटभट्टीवर मोठ्या शिताफीने त्या दोघांनाही ताब्यात घेतले. तर त्यांना किनगाव येथे घेऊन जाण्यासाठी त्या मुलीच्या आईसह सपोनि गजानन अन्सापुरे, पोलिस जमादार सय्यद महबूब हे एका खासगी वाहनाने सायंकाळी सहा वाजता सिरसाळ्यात दाखल झाले. मुलीच्या जबाबावरून पुढील कारवाई केली जाईल असे श्री. अन्सापुरे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The couple caught fleeing after getting married