आठवडाभरात कोरोनाचे १२७ रुग्ण, उस्मानाबाद जिल्ह्यात संख्या स्थिर

सयाजी शेळके
Monday, 14 December 2020

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत कोरोना संसर्गाचे प्रमाण स्थिर असल्याचे दिसून येत आहे.

उस्मानाबाद  : जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत कोरोना संसर्गाचे प्रमाण स्थिर असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये समाधानाची बाब म्हणजे आठवड्यात केवळ दोनच मृत्यूंची नोंद झाली आहे. कोरोनाचा संसर्ग दुसऱ्या टप्प्यात वाढेल असे संकेत मिळत होते. तशा सूचनाही आरोग्य विभागाकडून देण्यात येत होत्या. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर असल्याचे दिसून येत आहे.

आठवड्यात १२७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी (ता. सात) १६ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर मंगळवारी १७, तर बुधवारी मात्र ही संख्या २५ वर पोचली. दरम्यान गुरुवारी सर्वांत कमी म्हणजे केवळ सात रुग्णांची नोंद झाली. शुक्रवारी पुन्हा यामध्ये वाढ झाली. शुक्रवारी बाधीत रुग्णांची संख्या २८ होती. शनिवारी संख्येत घट होऊन १५ वर पोचली. रविवारी (ता. १३) पुन्हा १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

थंडीचा परिणाम
सध्या जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. आठवड्याच्या सुरवातीला थंडी होती. मात्र, त्यानंतर दोन दिवसांत थंडीचे वातावरण कमी झाले. आकाशात ढग दिसू लागल्याने थंडी कमी होऊन गरमी वाढू लागली. त्यामुळे सर्दी, खोकला यासारख्या आजारांना पोषक वातावरण राहिले नाही. त्यामुळे कदाचित रुग्णसंख्येत कमी असल्याचे बोलले जात आहे.

मृत्यूची संख्या घटली
जिल्ह्यात आठवड्यात केवळ दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही जिल्ह्यासाठी समाधानाची बाब म्हणावी लागत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाने ५५७ रुग्णांचा बळी गेला आहे. गेल्या आठ दिवसात बुधवारी (ता. नऊ) आणि शुक्रवारी (ता. ११) प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारात दरम्यान मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अँटीजेन तसेच आरटीपीसीआर टेस्ट होऊनही बाधितांची संख्या कमी झाल्याने जिल्ह्यासाठी ही समाधानाची बाब म्हटली जात आहे.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 127 Cases Recorded Within A Week Osamanad News