
किराणा सामान घेऊन घराकडे निघालेल्या शिंदाळा (ता.औसा) येथील कालिदास कोंडिबा वेदपाठक (वय ६५) या वृद्धास औसा - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदाळा येथे औशाहून -तुळजापूरकडे जाणाऱ्या क्रेनने बुधवारी (ता.नऊ) दुपारी एकच्या सुमारास चिरडले.
बेलकुंड (जि.लातूर) : किराणा सामान घेऊन घराकडे निघालेल्या शिंदाळा (ता.औसा) येथील कालिदास कोंडिबा वेदपाठक (वय ६५) या वृद्धास औसा - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शिंदाळा येथे औशाहून -तुळजापूरकडे जाणाऱ्या क्रेनने बुधवारी (ता.नऊ) दुपारी एकच्या सुमारास चिरडले. यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. शिंदाळा येथील कालीदास वेदपाठक हे किराणा सामान आणण्यासाठी घरातून गेले होते.
महामार्गावर असलेल्या एका किराणा दुकानातून किराणा घेऊन ते महामार्गावरून जात असताना औशाच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेन चालकाने (एमएच ०६ एसी ६६००) वेदपाठक यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेहावर बेलकुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले असून या प्रकरणी रविकांत कालीदास वेदपाठक यांच्या फिर्यादीवरून भादा पोलिस ठाण्यात क्रेन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास भादा पोलिस करित आहेत.
संपादन - गणेश पिटेकर