पोलिस पत्नीचा पास काढला अन् बहिणीला बीडमध्ये घेऊन आला 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या पतीने आपल्या बहिणीला घेऊन मुंबई-शिरूरघाट असा विनापरवाना प्रवास केला. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

केज (जि. बीड) - तालुक्यातील शिरूरघाट येथील मुंबई पोलिस दलात सेवेत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास मुंबईला जाण्यासाठी अत्यावश्यक सेवा पास काढून सोडण्यात आले; मात्र परत येताना महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या पतीने आपल्या बहिणीला घेऊन मुंबई-शिरूरघाट असा विनापरवाना प्रवास केला. याबाबतची माहिती दडवून ठेवल्याचे उघडकीस आल्याने याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तालुक्यातील शिरूरघाट येथील मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने सेवेवर रुजू होण्यासाठी अत्यावश्यक सेवा पास काढला होता. त्या पतीला घेऊन मुंबईला दाखल झाल्या; मात्र परत येताना पतीने आपल्या बहिणीला घेऊन मुंबई-शिरूरघाट असा विनापरवाना प्रवास केला. त्यानंतर शिरूरघाट येथे शांतीनाथ शाहू सांगळे यांच्या घरी कोणीतरी मुंबईहून आले आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावरून त्यांनी शिरूरघाट येथील सांगळे यांचे घर गाठले. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

त्यांच्याकडे चौकशी केली असता, आमच्या येथे कोणीही मुंबईहून आलेले नाही, असे सांगण्यात आले; परंतु पोलिसांना एक महिला मुंबईहून आल्याचे तिच्या हावभावावरून निदर्शनास आले. त्या महिलेकडे पोलिसांनी विचारणा केली असता, तिने मी व माझा भाऊ मुंबईहून आलो आहोत, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तुमची आरोग्य तपासणी करून घ्या, अशा सूचना केल्या. त्यावेळी सांगळे कुटुंबीयांनी त्यास विरोध करीत तिला कोरोना झाला नाही, असे उत्तर दिले.

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...

यापूर्वीही ग्रामसुरक्षा दलाचे कार्यकर्ते त्यांना आरोग्य तपासणी करायला जा म्हणून सांगायला गेले होते. त्यांनाही सहकार्य न करता आपली माहिती लपवून ठेवली. त्यामुळे पोलिस नाईक आतिष मोराळे यांनी केज ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सोनिया कारभारी गुट्टे (रा. वसई, मुंबई), तिचे नातेवाईक शांतीनाथ शाहू सांगळे, वैजनाथ रावसाहेब सांगळे, प्रशांत बाबासाहेब सांगळे, अशोक शांतीनाथ सांगळे यांच्याविरोधात केज पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime against five persons at kaij Police Station