1 august 2019 : क्राइमनामा, औरंगाबादमध्ये कुठे विनयभंग, तर कुठे अपघात...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

औरंगाबाद शहरात काल (ता. १ आॅगस्ट) विविध पोलिस ठाण्यांमध्ये चोरी, माहराण, विनयभंग आणि अपघाताच्या गुन्ह्यांची नोंद झाली. त्याचा एकत्रित वृत्तांत

औरंगाबाद - शहरात काल (ता. १ आॅगस्ट) विविध पोलिस ठाण्यांमध्ये चोरी, माहराण, विनयभंग आणि अपघाताच्या गुन्ह्यांची नोंद झाली. त्याचा एकत्रित वृत्तांत

एकतर्फी प्रेमातून तरुणीची छेड 
एकतर्फी प्रेमातून तरुणीचा पाठलाग करून तिची छेड काढून शिवीगाळ, धमकावल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तरुणाविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. बावीस वर्षीय तरुणीने याबाबत तक्रार दिली. त्यानुसार इम्रान सिद्दिकी इब्राहीम (वय 30) असे संशयिताचे नाव आहे. तो एक वर्षापासून तरुणीचा पाठलाग करीत होता व प्रेमासाठी तिला तो सक्ती करीत होता. तरुणीच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून धमकावल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. 

विद्यार्थ्याचा लॅपटॉप लंपास 
ऋषिकेश गोविंद शेवाळे (रा. केसरसिंगपुरा, कोकणवाडी) या विद्यार्थ्याचा लॅपटॉप खोलीतून लंपास झाला. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 

हॅंडल लॉक तोडून दुचाकीची चोरी 
गोविंदा चंपालाल भुतडा (रा. गजानननगर, गारखेडा) यांची दुचाकी चोराने हॅंडल लॉक तोडून लंपास केली. ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याबाबत भुतडा यांच्या तक्रारीनुसार पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
दुचाकीच्या धडकेत पादचारी जखमी 
दुचाकीने धडक दिल्याने चांगदेव भागाजी थोरात (रा. मकाई गेट, प्रगती कॉलनी) जखमी झाले. हा अपघात दिल्ली गेट चौकीसमोर सायंकाळी चारच्या सुमारास घडला. यात थोरात जखमी झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दुचाकी (एमएच 15, डीव्ही 9721) चालकाविरुद्ध सिटी चौक ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
हद्दपार तरुण ताब्यात 
हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वास्तव्य करणाऱ्या एकाला सिटी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शहागंज भाजीमंडईत करण्यात आली. शेख सलमान शेख मकसूद (रा. नेहरूनगर, कटकट गेट) असे संशयिताचे नाव आहे. त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तरीही तो शहरात वास्तव्य करीत होता. त्याच्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.  

अपघातानंतर दुचाकी पळविली 
दुचाकी स्लीप होऊन अपघातात जखमी झालेला दुचाकीस्वार उपचारासाठी रुग्णालयात गेला. त्यानंतर त्याची दुचाकी चोरी झाल्याचा प्रकार दुपारी एक ते दीडच्या सुमारास
विमानतळासमोर जालना रस्त्यावर घडला. याबाबत चंद्रमुनी प्रकाश दाभाडे (रा. वाकुळणी, ता. बदनापूर) यांनी तक्रार दिली. विमानतळासमोर झालेल्या अपघातानंतर दाभाडे रुग्णालयात उपचारासाठी गेले. तेथून परत अपघातस्थळी आल्यानंतर त्यांची दुचाकी तेथे नव्हती. दुचाकी चोरी झाल्याने त्यांनी याबाबत एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
  
तहसील कार्यालयात तोडफोड, तिघांवर गुन्हा 
तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात येऊन शिवीगाळ करून तिघांनी तोडफोड केली. ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. वीस ते बावीसवर्षीय तीन तरुण निवडणूक विभागात आले. त्यावेळी तिथे मोमीन मोहम्मद जफर सलीम काम करीत होते. तिघांनी सरकारी कामात अडथळा करून शिवीगाळ केली. त्यानंतर कार्यालयात तोडफोड केली, अशी तक्रार मोमीन मोहम्मद जफर सलीम यांनी दिली. त्यानुसार याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
पंधरा मिनिटांत फोडले घर
पंधरा मिनिटांत कुलूप तोडून घरातील 21 हजार तीनशे रुपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला. ही घटना राजनगर, शहानूरवाडी भागात घडली. महेश पुरुषोत्तम औरंगाबादकर हे राजनगर, शहानूरवाडी येथे राहतात. ते आई-वडिलांना भेटण्यासाठी जय विश्‍वभारती कॉलनीत गेले. त्यानंतर सुमारे पंधरा मिनिटांत चोरांनी चोरी केली. लोखंडी खिडकीचा गज तोडून चोरांनी घरात प्रवेश करून मोबाईल व इतर वस्तू लांबविल्या. औरंगाबादकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime News in Aurangabad city of 1 August