वाचा, औरंगाबादचा क्राइमनामा : अपघात, चोरी, विनयभंग, मारहाण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

रेकॉर्डवरील गुन्हेगाराला बेड्या, नशाकारक गोळ्या जप्त 
नशापान करण्यासाठी गोळ्यांची साठवणूक करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरात करण्यात आली. अनिल अंबादास माळवे (रा. मुकुंदवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी औषध निरीक्षक राजगोपाल बजाज यांच्या मदतीने सापळा रचून माळवे याला मुकुंदवाडी येथील रेल्वेस्थानकानजीक देशी दारू दुकानाजवळून सकाळी पकडले. त्याच्याकडून नायट्रोझेपामच्या तेरा स्ट्रीप जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक
पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, महादेव पुरी, जमादार रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, प्रवीण मुळे, रवी जाधव, जालिंदर मांटे, शिवाजी गायकवाड यांनी केली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

महिलेचा विनयभंग, तिघांवर गुन्हा 
हातउसने घेतलेले पैसे देण्यासाठी पस्तीसवर्षीय महिलेला घरी बोलावून घेतले. त्यानंतर मारहाण करून तिचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (ता. 24) पुंडलिकनगर पोलिस ठाणे हद्दीत घडली. याप्रकरणी महिलेने तक्रार दिली. त्यानुसार सुभाष, अनिल, सुनील अशी संशयितांची नावे आहेत. त्यांनी पैसे मागितल्यास केस करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
 

कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी 
कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना रात्री आठच्या सुमारास शरद टी-पॉइंट ते टीव्ही सेंटरदरम्यान घडली. याबाबत ऊर्मिला ज्ञानेश्‍वर साताळकर (रा. संभाजी कॉलनी, जाधववाडी) यांनी तक्रार दिली. त्यांचे पती ज्ञानेश्‍वर साताळकर व मुलगी दुचाकीने शरद टी-पॉइंटमार्गे घरी जात होते. त्यावेळी हा प्रकार घडला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
चौघांचे मोबाईल हिसकावणारा जाळ्यात 
पाच महिन्यांपूर्वी चौघांचे मोबाईल हिसकावून पसार झालेल्यांपैकी एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी (ता. 26) अटक केली. विठ्ठल जनार्दन काकडे (वय 19, रा. वेणी, ता. लोणार, जि. बुलडाणा) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. बबलू रशीद सय्यद (रा. मिलकॉर्नर), सुमिता अरुण कुलकर्णी, गजानन रामप्रसाद अंकर व सचिन त्रिंबकराव मैड यांचे मोबाईल दुचाकीवरून आलेल्या विठ्ठल व त्याच्या सहकाऱ्याने 17 फेब्रुवारीला रात्री नऊदरम्यान हिसकावले होते. त्यानंतर ते दोघेही फरारी झाले होते. सायबर पोलिसांच्या मदतीने तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन बुधवारी काकडेला वेणी येथून गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक मोबाईल पोलिसांनी जप्त केला.

  
संजयनगरातून मोबाईल लंपास 
सुनील सुभाषराव अंभुरे (रा. संजयनगर, बायजीपुरा) यांच्या घरातून चोराने मोबाईल लंपास केला. ही घटना बायजीपुरा, संजयनगर भागात घडली. उघडा दरवाजा पाहून चोर आत घुसला व त्याने कूलरवरील मोबाईल लंपास केला. अशा तक्रारीनुसार याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

मारहाण करून मंगळसूत्र हिसकाविले 
शबानाबी मिर्झा महेमूद बेग (वय 30, रा. अजीज कॉलनी, नारेगाव) या महिलेला मारहाण करून तिचे मंगळसूत्र हिसकाविले. ही घटना गुरुवारी (ता. 25) नारेगाव रोडवर पटेल हॉटेलसमोर घडली. याबाबत महिलेने तक्रार दिली. त्यानुसार शेख गफ्फार (रा. नारेगाव) असे संशयिताचे नाव आहे. महिला मुलीला शाळेतून घेऊन येताना शेख गफ्फार याने महिलेला मारहाण केली व तिचे मंगळसूत्र व कानातले हिसकावून नेले. अशा आरोपाखाली एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
 हद्दपार असलेल्याला अटक 
हद्दपार असूनही शहरात वास्तव्य करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी शुक्रवारी (ता. 26) अटक केली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार शेख सलीम ऊर्फ काला शेख यासीन (रा. नेहरूनगर, कटकट गेट) असे संशयिताचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी त्याला वाढत्या गुन्हेगारीमुळे दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार करण्यात आले होते. तो शहरात असल्याचे समजताच जिन्सी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक दत्ता शेळके व त्यांच्या पथकाने कटकटगेट भागातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

वाहनाच्या धडकेत विद्यार्थी जखमी 
मोपेड दुचाकीच्या धडकेत करण सुभाष राठोड (वय 14, रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी) हा विद्यार्थी जखमी झाला. ही घटना रविवारी (ता. 21) कामगार चौकाजवळ घडली. अपघातात करणच्या डाव्या हाताला फॅक्‍चर झाले. याप्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीनुसार मोपेड दुचाकीचालकाविरुद्ध (एमएच- 20, एफएफ- 4482) पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
कांचनवाडी येथील वाईन शॉप फोडले 
कांचनवाडी येथील वाईन शॉपचे शटर उचकटून चोरांनी रोख पंचवीस हजार रुपये व सोळाशे पन्नास रुपयांचे मद्य लंपास केले. ही घटना बुधवारी (ता. 24) घडली. याबाबत प्रकाश ताराचंद बवाडी (रा. कांचनवाडी) यांनी तक्रार दिली. त्यानुसार सातारा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास सहायक फौजदार शेख निसार करीत आहेत. 

वाहन लावण्यावरून दोघांची मारहाण 
वाहन लावण्यावरून दोघांनी एकाला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (ता. 23) एका हॉस्पिटलजवळील सफर हॉटेलसमोर घडली. याबाबत किरण प्रकाश राजपूत (रा. सातारा परिसर) वकील आहेत. क्रांती चौक ठाणे हद्दीतील एका रुग्णालयासमोर त्यांनी वाहन लावले. त्यावेळी दोघे आले व त्यांनी वाहन लावल्यावरून मारहाण सुरू केली. राजपूत यांच्या मामाच्या मुलाने मध्यस्तीचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयितांनी त्याच्या वाहनाचीही चाबी काढून धमकावले. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

शहरातील विविध भागांतून पाच दुचाकी लंपास 
शहरातील बीड बायपास रोड, गारखेडा, उस्मानपुरा, हडको, कर्णपुरा येथून चोरांनी तीन दुचाकी लंपास केल्या. या घटनांप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता.25)
गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

चुन्नीलाल भाऊलाल जाधव यांची दुचाकी चोराने बीड बायपास रोडवरील हिवाळे पाटील लॉन्सच्या पार्किंगमधून लंपास केली. ही घटना 20 जुलैला घडली. त्यांच्या तक्रारीनुसार याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ज्ञानेश्‍वर भगवान सुरुंग यांची दुचाकी चोराने गजानन महाराज मंदिर ते सेव्हन हिलदरम्यानच्या क्‍युबा हॉटेलच्या पार्किंगमधून लंपास केली. ही घटना 25 जुलैला घडली. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. भानुदास ज्ञानेश्‍वर शिरसाठ (रा. न्यू एसटी कॉलनी, सिडको) यांची दुचाकी चोराने हॅंडल लॉक तोडून लंपास केली. ही घटना आठ जुलैला सिटी केअर हॉस्पिटल, उस्मानपुरा येथे घडली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. वैभव गोरख दहातोंडे (रा. एन-नऊ, श्रीकृष्णनगर) यांची दुचाकी हॅंडल लॉक तोडून चोराने घरासमोरून लंपास केली. ही घटना 20 जुलैला घडली. याप्रकरणी दहातोंडे यांच्या तक्रारीनुसार सिडको पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.  वाहनचालक असलेले संजय आसाराम डोके (रा. गणेश कॉलनी, टीव्ही सेंटर) यांची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना वॉकिंग प्लाझा कर्णपुरा येथे घडली. त्यांच्या तक्रारीनुसार छावणी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
 
संशयित दुचाकीचोराला बेड्या 
संशयित दुचाकी चोराला गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी (ता. 26) अटक केली. त्याच्याकडून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार,
सुनील आप्पासाहेब कीर्तीकर (रा. एकतानगर, रांजणगाव शेणपुंजी) असे त्याचे नाव आहे.  त्याने दोन दिवसांपूर्वीच रांजणगावातून दुचाकी लांबवली होती. हमीदउल्ला खान शादत खान (रा. टाऊन हॉल) मजुरी काम करतात. एमआयडीसी वाळूज, रांजणगाव शेणपुंजीत ते कामावर दुचाकी घेऊन गेले. तेथील भगतसिंग शाळेजवळ दुचाकी ठेवल्यानंतर ती चोराने लंपास केली होती. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुचाकी चोर संशयिताची माहिती समजल्यानंतर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश धोंडे, जमादार सय्यद मुजीब, पोलिस नाईक गजानन मांटे, भावसिंग चव्हाण, राहुल खरात यांनी शोध घेऊन कीर्तीकरला पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने अडीच महिन्यांपूर्वीही याच भागातून दुचाकी चोरली होती. ही दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. गुन्हे शाखा पोलिसांनी
त्याला वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com