
लग्नापायी राज्यकर उपायुक्त पदावर निवडीचा बनाव, सोशल मीडियावरही झळकलेली यशोगाथा
भोकरदन : लग्नाची सोयरीक जमावी म्हणून तालुक्यातील कोदोलीच्या एका दुकानदार युवकाने चांगलेच डोके चालविले, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यकर निरीक्षक/राज्यकर उपायुक्त पदावर यश मिळविल्याचा बनावही केला. दरम्यान, शुक्रवारी (ता.पाच) या बोगसगिरी करणाऱ्या युवकावर भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोकरदन तालुक्यातील कोदोली येथील रामेश्वर पंढरीनाथ लोखंडे याने लग्नाची सोयरीक जमावी म्हणून राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविल्याचा बनाव केला होता.
राज्यकर सहआयुक्त मुख्यालयाने ता.११ नोव्हेंबर २०१९ अन्वये प्रसिद्ध केलेल्या निवड यादीमध्ये एकाचे नाव खोडून रामेश्वरने स्वतःचे नाव टाकले, राज्यकर उपआयुक्तऐवजी राज्यकर उपआयुक्त मुंबई असे नियुक्तीचे ठिकाण दाखवीत तोतयागिरी केली. त्यानंतर गावोगावी सत्कारही स्वीकारले. ही बाब लक्षात येताच राज्य लोकसेवा आयोगाने गंभीर दखल घेत कारवाईचे संकेतही दिलेले होते. दरम्यान, जालन्याचे राज्यकर निरीक्षक वस्तू व सेवा कर निरीक्षक गणेश संगम यांच्या फिर्यादीनुसार संशयित रामेश्वर लोखंडे याच्याविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल भोपळे करीत आहेत.
अनेकांनी आणल्या सोयरिकी
विशेष म्हणजे उपायुक्त पदावर यश मिळविल्याचा बनाव केलेल्या रामेश्वरचे या वर्षाच्या प्रारंभी गावोगावी सत्कार सुरू झाले. त्यामुळे त्याला अनेकांनी सोयरिकीही आणण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे सोशल मीडियावर त्याच्या यशोगाथाही झळकल्या. मात्र यात काहीतरी गडबड असल्याची शंका आल्याने एका वस्तू कर निरीक्षकाने थेट रामेश्वरचा फोन लावला. त्यात रामेश्वरची ‘पात्रता’ लक्षात आली. वस्तू कर निरीक्षकाने केलेल्या कानउघाडणीची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्याने सोयरिकीला आलेले अनेकजण सावध झाले. वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने अनेक वधुपित्यांची फसवणूक टळली.
Web Title: Crime News Fake Selection For Post Of Deputy Commissioner State Tax Marriage Social Media Bhokardan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..