अफवा पसरविल्यास गुन्हे दाखल होणार : पोलिस अधीक्षक योगेश कुमार 

राजेश दारव्हेकर
रविवार, 5 एप्रिल 2020

कोरोना विषाणूंसंदर्भात अक्षेपार्ह संदेश व अफवा पसरविण्यात येत आहेत. सदर प्रकार अतिशय गंभीर असून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर वादग्रस्त व समाजविघातक संदेश, व्हिडिओ टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

हिंगोली: सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता शासनाने लॉकडाउन घोषित केलेले आहे. या काळात सोशल मीडियावर कोणत्याही अफवा पसरवू नये, अन्यथा गंभीर स्‍वरूपाचे गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिला आहे.

कोरोना विषाणूंसंदर्भात काही काही समाजकंटक व असामाजिक संघटनेकडून व्हॉट्ॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टिकटॉक व इतर समाज माध्यमांद्वारे अक्षेपार्ह संदेश, व्हिडिओ पोस्ट करण्यात येत आहेत. त्यात विशिष्ट समाजाकडून जाणीवपूर्वक कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे त्या समाजाकडून कोणत्याही प्रकारच्या वस्तू खरेदी करू नये, अशा प्रकारच्या पोस्टचा समावेश आहे. 

हेही वाचा हिंगोलीकरांनी अनुभवली निरव शांतता

अफवांवर विश्वास ठेवू नये

तसेच कोरोना विषाणूंसंदर्भात अक्षेपार्ह संदेश व अफवा पसरविण्यात येत आहेत. सदर प्रकार अतिशय गंभीर असून यातून धार्मिक भावना दुखावून दोन धर्मांत, जातीत सामाजिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वादग्रस्त व समाजविघातक संदेश, व्हिडिओ आल्यास सोशल मीडियावर प्रसारीत करू नयेत. तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. अफवांवर विश्वास ठेवू नये. 

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होणार

सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा, अन्यथा अशा पोस्ट प्रसारीत करणारे व्यक्ती व सोशल मीडियावरील त्या ग्रुपचे ॲडमीन, पोस्टवर अक्षेपार्ह प्रतिक्रिया नोंदविणारी व्यक्ती, अशा सर्वांवर भारतीय दंड विधान, माहिती तंत्रज्ञान अधिनियम आपत्ती व्यवस्थापण अधिनियम व इतर प्रचलित विविध कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

येथे क्लिक कराकर्तव्य बजावत पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी

सायबर शाखा नजर ठेवून 

जिल्हा पोलिस सायबर शाखा अशा सोशल मीडियावर नजर ठेवून आहे. कोणत्याही प्रकारचे आपत्तीजनक व दोन समाजात तेढ निर्माण करणारे संदेश, व्हिडिओ प्रसारीत केल्याचे आढळून आल्यास ०२४५६ - २२०२३२, ८६६९९००६७६, १०० व हेल्प लाईन क्रमांक ८६६९९००६७५, ८६६९९००६७२, ९४२३१०८५१८ या कमांकावर संपर्क साधावा, जिल्ह्यात शांतता व सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी पोलिस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी केले आहे.

दुचाकीचालकांवर कारवाईची गरज

दरम्यान, जिल्हाप्रशासन कोरोना आजाराबाबत खबरदारी घेत असताना काही दुचाकीचालक मात्र, बिनधास्त रस्त्यांवरून फिरताना आढळून येत आहेत. यामुळे इतर नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime will be registered if rumors spread: Superintendent of Police Yogesh Kumar Hingoli news