कर्तव्य बजावत पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हा पोलिस दलातर्फे गरजू लोकांना अन्नदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. फिरत्या वाहनातून गरजूंपर्यंत अन्नाची पाकिटे पोचविली जात आहेत. 

हिंगोली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सुरू असल्याने मोलमजुरी करणाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्‍यांची कामे थांबल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. परराज्यात कामासाठी गेलेले अनेक जण जिल्‍ह्यात सीमा बंदीमुळे अडकले आहेत. यापैकी कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी सर्वत्र घेतली जात आहे. यासाठी पोलिस प्रशासनदेखील सज्‍ज झाले असून फिरत्या वाहनातून गरजूंपर्यंत अन्नाची पाकिटे पुरविली जात आहेत.

पोलिस अधीक्षक योगेश कुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हा पोलिस दलातर्फे गरजू लोकांना अन्नदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. फिरत्या वाहनातून गरजूंपर्यंत अन्नाची पाकिटे पोचविली जात आहेत. तसेच शहरातील विविध संस्‍था, मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनीधी अन्नदानासाठी पुढाकार घेऊन अन्न पुरवित आहेत. 

हेही वाचा ‘मी हिंगोलीकर... स्वयंशिस्त पाळणार, घरातच थांबणार!’

गरजूंना अन्नपुरवठा करण्याचा निर्णय

त्‍यात पोलिस प्रशासनाने पुढाकार घेत गरजूंना अन्नपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, नगरपालिका मुख्याधिकारी रामदास पाटील, पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, अंगद सुडके, देविदास इंगळे, शिवसांब घेवारे, किशोर पोटे, श्री. शिरसेवाड, श्री. गेडाम, बालाजी बोके, संभाजी लेकुळे, सुनील अंभोरे, श्री. मंगरूळकर, विठ्ठल काळे, श्री. थोरात, श्री. शेख आदींची उपस्‍थिती होती.

तपासणी नाक्‍यावर अल्‍पोहार

वारंगाफाटा ः येथील तपासणी नाक्यावर तलाठी संघटनेतर्फे पायी जाणाऱ्या गरजूसांठी अल्‍पोहार दिला जात आहे. या वेळी तपासणी नाक्यावरील शेख जावेद, श्री. इंगोले, तलाठी व्ही. एन. ठाकरे, ज्ञानेश्वर मगर, आरोग्य कर्मचारी आजमत पठाण आदींची उपस्‍थिती होती. तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रुपेश कदम यांच्यातर्फे वारंगा, तोंडापूर, भुवनेश्वर येथील ५० गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या वेळी युवा मोर्चाचे सर्कल प्रमुख गजानन कदम, राजकुमार जाधव, श्रीपत जिनेवाड, दत्ता कोंडामंगल, कैलास पिंपरे, अनिनाश डोनगे, प्रशांत जोंधळे, बाळूआप्पा पत्रे, दीपक पत्रे, गजानन अर्धापुरे आदींची उपस्‍थिती होती.

येथे क्लिक कराहिंगोलीकरांना दिलासा; चौघांचे अहवाल निगेटिव्ह

शिवसंग्रामतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी पंधरा हजारांचा निधी

हिंगोली : राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असताना कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी हिंगोली येथील शिवसंग्राम पक्षातर्फे देवानंद जाधव यांनी मुख्यमंत्री रिलीफ फंडासाठी पंधरा हजारांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे सुपूर्त केला आहे.
कोरोनाग्रस्तांवर औषधोपचार करण्यासाठी प्रत्येकजण आपआपल्या परीने मदत करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली येथील शिवसंग्राम संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष देवानंद जाधव यांनीदेखील पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली आहे. या लढ्यात उपजिल्हाप्रमुख विठ्ठल जाधव पाटील, तालुकाध्यक्ष भागवत शिंदे, सुदर्शन उंडाल आदींचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police committed social responsibility while performing duty Hingoli news