esakal | लातुरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ७७३ जणांवर गुन्हे दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19 curfew

लातुरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ७७३ जणांवर गुन्हे दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या संचारबंदी सुरू आहे. असे असतानाही नागरिक विनाकारण रस्त्यावर येत आहेत. दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असताना ती सुरू ठेवली जात आहेत. वारंवार सूचना केल्या जात आहेत. तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्ह्यात ता. ३० एप्रिल ते दोन मे या तीन दिवसांत कारवाईची मोहीम हाती घेतली. यात जिल्ह्यात ७७३ जणांवर ७४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारपेक्षा जास्त रुग्ण समोर येत आहेत. कोरोनाचा उपचार सुरू असताना मृत्यू होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदी सुरू आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरीकांनी घरीच सुरक्षित राहणे आवश्यक आहे. पोलिस रोज रस्त्यावर उतरून नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्नही करीत आहेत. तरीदेखील नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत आहेत. गेल्या वर्षाच्या लॉकडाउनच्या काळात पोलिसांनी काठ्यांचा प्रसाद दिला होता. पण, यावर्षी पोलिसांनी हात आखडता घेतला आहे. त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी ता. ३० एप्रिल ते दोन मे या कालावधित कारवाईची धडक मोहीम हाती घेतली होती.

हेही वाचा: अवकाळी पावसाचा तडाखा! शाळेची पत्रे वार्‍याने कागदासारखी उडाली

जिल्ह्यातील २३ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. यात ता. ३० एप्रिल रोजी ४०७ जणावर ३४ गुन्हे, ता. एक मे रोजी १८६ जणावर १९ गुन्हे तर ता. दोन मे रोजी १८० जणावर २१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे तीन दिवसात ७७३ जणावर ७४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात बहुतांश गुन्हे हे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर आहेत तर काही गुन्हे संचारबंदीच्या इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणीचे आहेत.

हेही वाचा: चिंताजनक! उमरग्यात महिनाभरात दीड हजारांहून अधिक कोरोना रुग्ण

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता नागरिकांनी घरी बसून सुरक्षित राहण्याची गरज आहे. अत्यावश्यक सेवेलाच संचारबंदीतून सूट आहे. पण, नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे तीन दिवस कारवाईची मोहीम राबवून गुन्हे दाखल केले आहेत. या पुढेही अशीच कारवाई केली जाणार आहे.
- निखिल पिंगळे, पोलिस अधीक्षक.

loading image
go to top