परभणीतील पिकांना धोक्याची घंटा

कैलास चव्हाण
बुधवार, 17 जुलै 2019

- कसा तरी पडणारा हलका पाऊसही आता गायब झाला आहे.

- मागील सहा दिवसापासून पावसाने उघडिप दिल्याने कोवळी पिके संकटात आली असून त्यामुळे दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.

- जिल्ह्यातील तब्बल चार लाख 55 हजार 880 हेक्टरवरील पिके संकटात असून तेरा टक्के क्षेत्र अजुनही पडीक आहे.

परभणी : कसा तरी पडणारा हलका पाऊसही आता गायब झाला आहे. मागील सहा दिवसापासून पावसाने उघडिप दिल्याने कोवळी पिके संकटात आली असून त्यामुळे दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. जिल्ह्यातील तब्बल चार लाख 55 हजार 880 हेक्टरवरील पिके संकटात असून तेरा टक्के क्षेत्र अजुनही पडीक आहे.अजुनही दोन ते तीन दिवसात पाऊस झाला नाही तर दुष्काळाची स्थिती यंदाही कायम राहण्याची शक्यता आहे.

यंदा सुरुवातीपासून पावसाने दगा दिला आहे. शेतकऱ्यांनी जून महिन्यात हलक्या पावसावर धोका पत्करीत पेरण्या केल्या आहेत. जुलै महिन्याच्या दुसऱ्या अठवड्यात देखील पेरण्या सुरु होत्या. यंदा खरिपासाठी पाच लाख 21 हजार 870 हेक्टर क्षेत्र प्रस्तावीत आहे. आतापर्यंत चार लाख 55 हजार 880 हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. 87.36 टक्के पेरण्या झाल्या असल्यातरी तेरा टक्के क्षेत्र अजुनही पडीक राहीले आहे.

मागील गुरुवारी (ता.11) जिल्ह्यात सर्वदूर हलक्या स्वरुपाचा पाऊस पडल्याने काही अंशी खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले. परंतु आता सहा दिवस झाले तरी पावसाचा थेंबही पडला नसल्याने पिके 
धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. आणखी दोन ते तीन दिवसांत पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांना परत पेरणी करावी लागणार आहे. आता परत पेरणीची वेळही निघुन जात आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच  अडचणीत आले आहेत.

कपाशीची लागवड घटली

आता पर्यंत एकदाही मोठा पाऊस झाला नाही. तसेच हलका पाऊस देखील उशीरा झाला. त्यामुळे कपाशीची लागवड घटली आहे. यंदासाठी दोन लाख 94 हजार 80 हेक्टर कपाशीचे क्षेत्र प्रस्तावीत आहे. मात्र आतापर्यंत केवळ एक लाख 86 हजार 219 हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. तर सोयाबीन मध्ये मात्र वाढ झाली आहे.

अठ्ठ्याऐंशी हजार 680 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी प्रस्तावीत होती.त्यात वाढ होऊन एक लाख 92 हजार 64 हेक्टरवर पेरणी झाली आहे.तुरीचे 61 हजार 230 हेक्टर क्षेत्र प्रस्तावीत आहे.यामध्येदेखील मोठी घट झाली आहे. चाळीस हजार 991 हेक्टरववर तुरीची पेरणी झाली आहे. मुग त्रेपन्न हजार 150 हेक्टरपैकी तेवीस हजार 598 हेक्टरवर पेरणी झाली आहे. उडीद चौदा हजार 140 पैकी 6 हजार 417 हेक्टरवर पेरणी झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crops from Prabhani at risk