साहित्य संमेलनात कोटींच्या उड्डाणांना ‘ब्रेक’

सुशांत सांगवे 
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

मराठवाड्यात सुमारे सोळा वर्षांनी साहित्य संमेलन होत आहे. ते दिमाखदार; पण साधेपणाने होईल. भपकेबाजपणा नसेल. भक्कम राजकीय पाठबळ स्वीकारण्याऐवजी आम्ही परिषदेचे कार्यकर्ते एकत्र येऊन सर्वसामान्य वाचकांच्या मदतीने हा उत्सव साजरा करणार आहोत. तशी तयारी सुरू आहे.
- नितीन तावडे, स्वागताध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य संमेलन

लातूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हटले, की राजकीय आशीर्वाद आणि कोटींची उड्डाणे हे समीकरणच बनले आहे. ते बदलून संमेलनाला वेगळे वळण देण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला आहे. त्यामुळेच यंदाचे संमेलन साधेपणाने अन्‌ राजकीय आशीर्वादाशिवाय साजरे करण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत. संमेलनाचे ‘बजेट’ही ९० लाखांपर्यंत ठेवण्यात आले आहे. त्यासाठी लोकवर्गणीचा पर्याय निवडण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांत झालेल्या साहित्य संमेलनात आयोजक संस्थेने कोट्यवधी रुपये खर्च करून संमेलन साजरे केले. संमेलनाच्या या बदलत्या स्वरूपाचे काहींनी स्वागत केले. मराठी भाषेचा उत्सव दिमाखदार पद्धतीने, मराठी भाषेला साजेल अशाच स्वरूपात साजरा व्हावा, अशा अपेक्षाही व्यक्त केल्या. दुसरीकडे काही लेखकांनी या उत्सवी स्वरूपाबद्दल आणि भपकेबाजपणाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. हे मंदिर सरस्वतीचेच असावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्यामुळे संमेलनाच्या ‘बजेट’वर साहित्य वर्तुळात चर्चा रंगू लागल्या.

साहित्य महामंडळाचे फिरते कार्यालय नुकतेच औरंगाबादमधील मराठवाडा साहित्य परिषदेकडे आले आहे. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी संमेलन कशा पद्धतीने भरवावे, याबाबतच्या सूचना उस्मानाबादच्या आयोजक संस्थेला नुकत्याच दिल्या. यात संमेलन साधेपणाने, राजकीय आशीर्वादाशिवाय या दोन सूचनांचा समावेश आहे, अशी माहिती महामंडळातील सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली. साधेपणाने म्हणजे संमेलनात भपकेबाजपणा नसेल. संमेलनातील कार्यक्रम, येणाऱ्यांची निवास, भोजनाची व्यवस्था उत्तम केली जाणार आहे, असेही सांगण्यात येत आहे. 

राज्य सरकारने साहित्य संमेलनासाठी ५० लाखांचा निधी साहित्य महामंडळाला दिला आहे. यात लोकवर्गणीतून जमा होणाऱ्या ३० ते ३५ लाख रुपयांची भर टाकून यंदाचे संमेलन साजरे करण्याचा प्रयत्न होईल.

मागील संमेलनांचा खर्च

  • घुमान (पंजाब) - अडीच कोटी
  • पिंपरी-चिंचवड - साडेसहा कोटी
  • डोंबिवली - चार कोटी ८२ लाख
  • बडोदे - दोन कोटी ८६ लाख
  • यवतमाळ - तीन कोटी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crore rupees expenditure on Marathi Sahitya Sammelan