आठ महिन्यांची प्रतीक्षा संपली, परळीत प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांचा मेळावा! 

प्रा. प्रविण फुटके
Monday, 16 November 2020

कोरोना महामारीनंतर आठ महिन्यांपासून बंद असलेले मंदिरे, देवालये सोमवारी ता.16 खुले करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे.  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले परळीचे प्रभु वैद्यनाथाचे मंदिर खुले करण्यात आला. देवाचा आणि भक्ताच्या भेटीचा हा सोहळा डोऴ्याचे पारणे फेडणारा ठरत आहे. 

परळी वैजनाथ (बीड) :  बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिर कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून तब्बल आठ महिने बंद करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्याने दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर सोमवारी (ता.१६) उघडण्यात आल्याने शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मार्च महिन्यांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्यामुळे देशातील सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे मार्च महिन्यात बंद करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या वतीने व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालय व प्रार्थना स्थळेच आणखी उघडण्यात आली नव्हती. यामुळे धार्मिक स्थळे असलेल्या परिसरातील दुकानदारावर उपासमारीची वेळ आली होती. यासाठी विविध राजकीय पक्षांनी धार्मिक स्थळे उघडावीत म्हणून आंदोलने केली. अखेर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिवाळीच्या पाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.१६) सर्व धर्मीय धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांसह मंदिर परिसरात असलेल्या दुकानदारांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच रविवारी प्रभू वैद्यनाथाचे मंदिराचे प्रवेश द्वार उघडून साफसफाई करण्यात आली. भाविकांसाठी रांगेची व्यवस्था करण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

काय म्हणतात लोक... 

यासंदर्भात शिवभक्त लक्ष्मण भोयटे यांनी सांगितले की, आम्ही नेहमी दर्शनासाठी वैद्यनाथ मंदिरात जात असतो. पण आठ महिन्यांपासून प्रभू वैद्यनाथाचे दर्शन होत नव्हते. गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरे उघडावीत म्हणून आम्ही प्रार्थना करत होतो. सोमवारी मंदिरे उघडण्यात आल्याने आनंद झाला आहे.

वैद्यनाथ मंदिर परिसरातील दुकानदार श्री. गडेकर यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून मंदिरे बंद असल्याने आमचे दुकानेही बंद होती. अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती. पण आता मंदिरे सुरू झाल्याने आनंद होत आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crowd devotees for darshan of Lord Vaidyanatha Parli