बालदिनी रडणारा मुलगा "दामिनी'मुळे हसला 

उमेश वाघमारे 
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

जालना :  रस्ता चुकल्यानंतर पोचविले घरी, नातेवाइकांच्या स्वाधीन 

जालना - घरचा रस्ता विसरल्याने रडत बसलेल्या एका मुलाला दामिनी पथकाने सुखरूप त्याच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केले आहे. ही घटना गुरुवारी (ता. 14) घडली. या मुलाच्या नातेवाइकांनी दामिनी पथकाचे आभार मानले. शिवाय मुलाच्या चेहऱ्यावरही हसू फुलले. 

जालना शहरातील मंठा बायपास मार्गावर गस्तीदरम्यान गुरुवारी (ता. 14) दामिनी पथकाला रेल्वे उड्डाणपुलाजवळ एक सहा ते सात वर्षांचा लहान मुलगा रडताना दिसून आला. त्यामुळे दामिनी पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी आपली गाडी थांबवून त्याची आस्थेवाईकपणे विचारपूस केली; मात्र या मुलाला आपल्या घराचा पत्ता सांगता येत नव्हता; परंतु आई-वडील इथेच राहतात असे तो सांगत होता. त्यानंतर दामिनी पथकाने परिसरात त्या मुलाच्या घराचा शोध घेण्यास सुरवात केली. अखेर काही तासांनंतर दामिनी पथकाला या मुलाच्या नातेवाइकांचा शोध लागला. बालकाला दामिनी पथकाने त्याच्या काकूंच्या स्वाधीन केले. 

बालदिनानिमित्त शाळेत मार्गदर्शन 
बालदिनानिमित्त शहरातील जैन स्कूल, स्वामी विवेकानंद शाळा, शिवाजी हायस्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांसह त्यांच्या हक्काचे तसेच आत्मरक्षणाचे दामिनी पथकाकडून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्यासह त्यांच्या पथकातील महिला पोलिस कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crying boy laughed