आईसाठी 'ती'चा आकांत; पोलिसही हेलावले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

औरंगाबाद : पाच वाजता शाळेतून घ्यायला येणारी आई आलीच नाही. उलट तिला रक्तबंबाळ पाहून सहावर्षीय मुलगी भेदरली. आईला रुग्णालयात नेल्याने ती काहीवेळ शांतही बसली. पण रात्री उशिरा तिने "आई कुठेय, मला आईला भेटायचंय,'' असा अट्टाहास धरत रडू लागली. तिचा आकांत पाहून अवघे पोलिस ठाणे हेलावले. अर्थात, तिच्या प्रश्‍नाला पोलिसांकडे कोणतेही उत्तर नव्हते. 

हडको एन-12 येथे नव्यानेच राहण्यासाठी आलेल्या विवाहित सुनंदा शिवाजी ऊर्फ प्रमोद वाघमारे हिचा सहा डिसेंबरला गळा चिरून खून झाला. पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या सुनंदाला दोन मुलं. त्यात मोठी मुलगी दुसरीला असून आईसोबत घडलेल्या काही घटना तिने डोळ्यांनी बघितल्या होत्या; पण आई या जगात नसल्याचा अंदाज तिला येत नव्हता. तिने ठाण्यात आईला भेटण्याचा अट्टाहास धरून उपस्थितांना निरुत्तर केले. तिच्या क्षीण स्वरांनी पोलिस आणि नातेवाइकांना गहिवरून आले. खुनात संशयित शुभम भाऊराव बागूल याला सिडको पोलिसांनी अटक केली. पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने तोंड उघडले. ""माझी आणि सुनंदाची ओळख होती. आमचे एकमेकांवर प्रेम होते. तिचीही प्रेमाला संमती होतीच. आम्ही सोबतही राहायचो; परंतु नंतर ती टाळू लागली. यामुळे माझा पारा चढत होता. त्यातून मी तिला संपवले'' अशी माहिती त्याने दिली. संशयित शुभम बागूल याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता बारा डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले, अशी माहिती पोलिस निरीक्षक परदेशी यांनी दिली. 

...मग ती टाळू लागली 
माहेरी जाधववाडीतून सुनंदा सिद्धार्थनगर येथे राहण्यास आली. तिथे शुभमकडून प्रेमाऐवजी जास्त त्रास सुरू झाला. त्यामुळे तिने त्याला भेटणे टाळले; पण शुभमचा रेटा सुरूच होता. त्याच्याशी कोणतेही संबंध तिला ठेवायचे नव्हते. त्यामुळे ती गुपचूप खोली बदलून हडको एन-12 मध्ये आली; पण त्याने तिला शोधून काढले होते, असे निरीक्षक परदेशी यांनी सांगितले. 

Web Title: crying for mother after her death