मिरवणुकीदरम्यान वादानंतर पूर्णा शहरात संचारबंदी लागू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

पूर्णा - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात शुक्रवारी (ता. 14) काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान रात्री क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी बंदुकीच्या पाच फैरी हवेत झाडल्या. शहरात संचारबंदी लागू करण्यात आली असून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात आता शांतता असून नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, शांतता कायम राखावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी केले आहे.

शहरात सायंकाळी सहाला सार्वजनिक मिरवणुकीला सुरवात झाली. मिरवणूक शहरातील जुन्या भागात आली असता क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यावरून हाणामारी सुरू झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता जमावाकडून दगडफेक सुरू झाली.

दरम्यानच्या काळात जाळपोळीचेही प्रकार झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी बंदुकीच्या पाच फैरी हवेत झाडल्या. त्यानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिस ठाण्यात रात्री जमाव आला. जमावाला शांत करण्यासाठी तेथेही पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिस अधीक्षक ठाकर यांच्यासह तहसीलदार पांडुरंग माचेवाड, पोलिस निरीक्षक एस. आर. कोल्हे यांनी शहरवासीयांना शांततेचे आवाहन केले.

नागरिकांनी शांतता राखावी
नागरिकांनी शांतता राखावी, संयम बाळगावा, अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांच्यासह "सकाळ माध्यम समूहा'तर्फेही करण्यात आले आहे.

Web Title: curfew in purna city by rally dispute