हिंगोलीच्‍या पालकमंत्र्यांबाबत उत्‍सुकता; अतुल सावे की अनिल बोंडे?

मंगेश शेवाळकर
रविवार, 16 जून 2019

जिल्‍ह्‍याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्‍याने हिंगोलीचे पालकत्व कोणाच्या पदरी येईल, याची उत्‍सुकता निर्माण झाली आहे.

हिंगोली : जिल्‍ह्‍याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्‍यामुळे आता हिंगोली जिल्‍ह्‍यासाठी नवा पालकमंत्री कोण याची उत्‍सुकता निर्माण झाली आहे. मंत्रिमंडळात स्‍थान मिळालेले अतूल सावे, डॉ. अनिल बोंडे, डॉ. अशोक उईके यांची नावे चर्चेत आली आहेत.

राज्‍याचे सामाजिक न्याय राज्‍यमंत्री दिलीप कांबळे मागील चार ते सव्वाचार वर्षापासून हिंगोली जिल्‍हयाचे पालकमंत्री म्‍हणून कार्यरत होते. पालकमंत्री म्‍हणून काम करताना त्‍यांनी शेतकऱ्यांच्‍या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्‍यांनी मोठे प्रयत्‍न केले. रोहित्राच्‍या प्रश्नावर त्‍यांनी वीज कंपनीला चांगलेच धारेवर धरले होते. याशिवाय तूर खरेदीच्‍या मुद्यावरही त्‍यांनी मार्केटींग फेडरेशनला आवश्यक त्‍या सूचना दिल्‍या होत्‍या. हिंगोली येथील कोषागार कार्यालयाची इमारत त्‍यांच्‍या काळातच उभी राहिली. जिल्‍ह्‍यातील महत्‍वाचा असलेला सिंचनाचा प्रश्न आमदार तान्‍हाजी मुटकुळे, माजी खासदार ॲड. शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे यांना सोबत घेत मार्गी लावला. या प्रश्नासाठी आमदार श्री. मुटकुळे यांनी राज्‍यपाल सी. विद्यासागर राव यांच्‍या भेटी घेवून प्रश्न मार्गी लावला. यामध्ये श्री. कांबळे यांचे योगदान आहे.याशिवाय संत नामदेव महाराजांचे जन्‍मस्‍थान असलेल्‍या नर्सी नामदेव येथे विकासकामांसाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी तसेच औंढा ज्‍योतिर्लिंगाच्‍या विकासासाठी दहा कोटीचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतला. मात्र मागील काही दिवसात श्री. कांबळे यांच्‍या हिंगोली जिल्‍ह्‍यात दौऱ्याचे प्रमाण कमी झाले होते. तर ध्वजवंदनासाठी आल्‍यानंतर लगेचच ते परत औरंगाबादकडे जावू लागले होते. त्‍यामुळे पालकमंत्री श्री. कांबळे यांच्‍यावर विरोधकांकडून टीका देखील होवू लागली होती. मात्र या टिकांकडे दुर्लक्ष करत त्‍यांनी विकासकामांसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. 

दरम्‍यान, त्‍यांच्‍या राजीनाम्‍यानंतर आता हिंगोली जिल्‍ह्‍याचा पालकमंत्री कोण याची उत्‍सुकता निर्माण झाली आहे. औरंगाबादचे राज्‍यमंत्री अतूल सावे, डॉ. अनिल बोंडे, डॉ. अशोक उईके यांच्‍या नावाची चर्चा सुरु झाली आहे. मात्र मराठवाड्यातील प्रश्नांची जाण असल्‍यामुळे हिंगोलीच्‍या पालकमंत्री पदाची जबाबदारी श्री. सावे यांच्‍यावर सोपवली जाण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस घेणार निर्णय :
आमदार तान्‍हाजी मुटकुळे हिंगोली जिल्‍हयाच्‍या पालकमंत्री पदासाठी तीन मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत. तिन्‍ही मंत्र्यांसोबत आपला चांगला संबंध आहे. त्‍यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पालकमंत्र्यांची नियुक्‍तीबाबत निर्णय घेतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Curiosity about Hingoli Guardian Minister Atul Save or Anil Bonde