४६ दिवसांनंतरही रांगा कायम

४६ दिवसांनंतरही रांगा कायम

किल्लेधारूर - नोटाबंदीच्या निर्णयाला ४६ दिवस झाले. मात्र, चलन तुटवड्यामुळे येथील बॅंकांमध्ये रांगा कायम असून, बाजारपेठेत मंदी आहे. त्यामुळे सुरवातीला या निर्णयाचे स्वागत करणारे आता संताप व्यक्‍त करीत आहेत. एवढेच नाही तर शहरातील सहकारी बॅंकांना राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून मागणीप्रमाणे रोकड उपलब्ध केली जात नसल्याने त्यांचेही व्यवहार ठप्प आहेत. 

शहरात स्टेट बॅंक ऑफ हैद्राबाद, भारतीय स्टेट बॅंक आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅंक या राष्ट्रीयीकृत बॅंका आहेत; तर वैद्यनाथ बॅंक, दीनदयाल बॅंक, प्रियदर्शिनी बॅंक आणि छत्रपती शाहू बॅंक अशा चार सहकारी बॅंका आहेत. त्या सर्व ठिकाणी ग्राहकांची गर्दी कायम आहे. दुसरीकडे शहरातील एटीएममध्ये पैशांचा ठणठणाट आहे. बॅंकांमध्ये खातेदाराला ठरावीकच रक्कम दिली जात आहे. त्यामुळे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. 

याचा सर्वाधिक त्रास व्यापारी वर्गाला झाला आहे. व्यापाऱ्यांचे बहुतांश व्यवहार नगदीच होतात. त्यामुळे आजही शहरातील व्यापाऱ्यांना पैशाची चणचण जाणवू लागली आहे. 

शहरातील व्यापारी महानगरात माल खरेदी करण्यासाठी जात असून, तेथील व्यापारी नगदी पैसे मागत आहेत. नवीन नोटा अधिक मिळत नसल्याने येथील व्यापाऱ्यांना माल खरेदी करण्यासाठी त्रास होत आहे. 

तब्बल दीड महिना उलटल्यानंतरही बॅंकांसमोर होणारी गर्दी कमी होत नाही. दरम्यान, कधी-कधी बॅंकेत पैसे नसल्याने रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे. यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, या समस्या सोडवण्याची मागणी होत आहे. 

सहकारी बॅंकांची कोंडी
शहरातील एका सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक म्हणाले, ‘‘आम्ही सरकारी बॅंकातून आमची सरप्लस रोकड जमा करतो आणि आवश्‍यकता असल्यास त्यांच्याकडून घेतो; परंतु सध्या सरकारी बॅंकांनी असहकार्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे सहकारी बॅंकांना चलन तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांचा संताप उफाळून येण्यापूर्वी सरकारने योग्य नियोजन करणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com