नोटाबंदीचा बागायती पिकांना फटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

आर्थिक चणचणीमुळे तालुक्‍यातील शेतकरी अडचणीत 

तुळजापूर - नोटाबंदीनंतर अद्याप म्हणावे तेवढे चलन उपलब्ध होत नसल्यामुळे ऊस, द्राक्ष यांसारख्या बागायती पिकांना फटका बसत आहे. पैशांची चणचण असल्यामुळे शेतकऱ्यांना बागायती पिकांची लागवड करताना व ती टिकविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र तालुक्‍यात आहे. 

नोटाबंदीच्या चाळीस दिवसानंतर अद्याप बाजारपेठेवर मंदीचे सावट आहे. सर्वसामांन्यासह शेतकऱ्यांना बॅंकेतून पैसे काढण्यासाठी तासन्‌ तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यानंतरही दोन ते अडीच हजार रुपये हातावर टेकविण्यात येत आहेत. या चलन टंचाईमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात शेतकरी ऊस लागवड करतात. त्यासाठी बेणे खरेदी, शेतीची मशागत अशी कामे करावी लागत आहेत. मात्र शेतकऱ्यांकडे सध्या पैसा नाही. बॅंकेत खात्यावर पैसे असूनही ते गरजेप्रमाणे मिळत नाहीत. त्यामुळे शेतात पाणी असूनही पिके घेता येत नसल्याचे चित्र आहे.

उसाचे क्षेत्र तयार करण्यासाठी ट्रॅक्‍टरने कामे करावी लागतात. ट्रॅक्‍टर चालकाला मोबदला देण्यासाठी देखील शेतकरी विवंचनेत आहेत. काही शेतकऱ्यांनी द्राक्ष लागवड केली आहे. लागवडीसाठी मोठा खर्च केल्यानंतर पुढील वर्षांपर्यंत बाग टिकविण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज आहे, मात्र अनेक राष्ट्रीयीकृत बॅंका प्रतिसाद देत नाहीत. त्याचा फटकाही शेतकऱ्यांना बसत आहे. 

बागा टिकवायच्या कशा? 
मागील वर्षीच्या दुष्काळात द्राक्ष बागा टिकवल्या. आता आर्थिक अडचणींमुळे आमच्यासमोर बागा टिकवायच्या कशा हा यक्षप्रश्‍न उभा आहे.
- सौदागर कडप्पा माळी, द्राक्ष बागायतदार शेतकरी वडगाव (काटी, ता. तुळजापूर)

द्राक्षबागांसाठी कर्जाची गरज 
शेतकऱ्यांनी पैसे गुंतवून द्राक्षाच्या बागा लावलेल्या आहेत. मात्र आता या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची म्हणजेच कर्जाची आवश्‍यकता आहे. वेगवेगळ्या राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्यासाठी प्रयत्न आवश्‍यक आहेत.  
- खंडू यमगर, द्राक्ष बागायतदार, यमगरवाडी (ता. तुळजापूर)

शेतकऱ्यांकडे नाही भांडवल
शेतकऱ्यांकडे ऊस लागवडीसाठी सध्या भांडवल नाही. पैसे वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या उद्योगावर देखील परिणाम होत आहे.  
- धनाजी धावणे, शेतकरी वडगाव (काटी)

Web Title: currency ban effetc on agriculture