Ambajogai जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crop damage

Ambajogai : जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

अंबाजोगाई : पूस (ता.अंबाजोगाई) शिवारात मंगळवारी (ता.११) दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान बुधवारी (ता.१२) दुपारी नेकनूर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे एकीकडे पिकांचे नुकसान झाले तर दुसरीकडे धनेगाव धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली, त्यामुळे सायंकाळपर्यंत ८४ टक्के पाणीसाठा या धरणात झाला होता.

तालुक्यात जून, जुलै महिन्यात झालेल्या पावसानेही काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर काही ठिकाणी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात मंगळवारी पूस व घाटनांदूर शिवारात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांचे विशेषत: सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. या पावसाने पूस शिवारातील गट नं. ६३ मधील १० ते १५ शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. येथील शेतकरी अशोक त्रिंबक कचरे यांच्या ०.७५ आर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांनी आपल्या शेतात सोयाबीनसह कोबी, वांगे लावले होते. पावसाळ्यात झालेल्या व बुधवारच्या परतीच्या पावसाने या पिकांचे मोठे नुकसान झाले.

त्यांच्यासह इतर दहा शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्या पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करून मदत मिळवून द्यावी अशी मागणी अशोक त्रिंबक कचरे या शेतकऱ्याने तहसीलदारांकडे केली आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर केली, परंतु त्यात अंबाजोगाई तालुका वगळला.

तर विमा कंपनीने अग्रिम रक्कम देण्यास नकार दिला आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान लातूर, अंबाजोगाई, केज, कळंब या प्रमुख शहरांसह इतर १५ खेड्यांचा पाणी पुरवठा करणाऱ्या धनेगावच्या (ता.केज) मांजरा प्रकल्पात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ८४ टक्के पाणीसाठा झाला.