'जीएसटी'मुळे कमी होईल महागाईचा दर - आयुक्त महर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

लातूर - जीएसटी कायदा लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किमती कमी होऊन ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असून महागाईचा दरही कमी होण्यास मदत होणार आहे. जीएसटी म्हणजे उत्पादन व्यापार व सेवा यांसाठी देशपातळीवर एकच कर आकारला जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर एका सामाईक बाजारपेठेची निर्मिती होईल. या प्रणालीद्वारे पारदर्शकता येऊन वस्तू व सेवा वाद संपुष्टात येणार आहे, अशी माहिती औरंगाबाद येथील केंद्रीय उत्पादन शुल्क कार्यालयाचे आयुक्त सी. एल. महर यांनी दिली.

केंद्रीय उत्पादन शुल्क कार्यालय व विक्रीकर विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने बुधवारी (ता. 17) वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. विक्रीकर विभागाचे सहायक आयुक्त जी. एस. गवंडी, केंद्रीय उत्पादन शुल्क लातूर कार्यालयाचे अधीक्षक आर. डी. मालू, अधीक्षक डॉ. दीपक गुप्ता उपस्थित होते.

जीएसटी ता. एक जुलैपासून लागू होणार आहे. यात ग्राहक, व्यापारी व शासन या सर्व घटकांना लाभ होणार आहे; तरी ग्राहक व व्यापारी वर्गाने या कर प्रणालीबाबत कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. ही कर प्रणाली सोपी व सुटसुटीत असून अनेक करांऐवजी एकच कर आकारला जाणार असल्याने रोजगार वृद्धी, महसूल वाढ होऊन मेक इन इंडियाला चालना मिळणार आहे. जीएसटी अंतर्गत सर्व व्यवहार संगणकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार असून याअंतर्गत व्यापाऱ्यांनी नोंदणी करून हा कर भरणेच अधिक सोईचे व फायदेशीर आहे. कर परिषदेने शून्य टक्के, पाच टक्के, बारा टकके, 18 टक्के व 28 टक्के यांप्रमाणे कराचे पाच दर ठरविलेले असून लवकरच कोणत्या वस्तूसाठी किती कराचा दर असेल हे सांगितले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील नऊ हजार व्यापाऱ्यांपैकी सात हजार व्यापाऱ्यांनी या करप्रणालीअंतर्गत नोंदणी केलेली असून, उर्वरित व्यापाऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन विक्रीकर विभागाचे उपआयुक्त जी. एस. गवंडी यांनी केले आहे.

Web Title: dearness rate decrease by gst