वीज रोहित्र दुरुस्त करताना वीज धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

धारुर : विद्युत पुरवठा खंडीत केल्याचे सांगून लाईनमनने शेतकऱ्यास दुरुस्तीचे काम करण्यास वीज रोहित्रावर चढविले. मात्र, अचानक वीजेचा जोरदार धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जहागिरमोहा येथे शनिवारी (ता. १९) घडली. शंकर मुकाजी ईरमले (वय ५८) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात शाखा अभियंता एस. डी. घुले व लाईनमन बाबुराव तिडके या दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

तालुक्यातील जहागिरमोहा गावास विद्युत पुरवठा करणारे वीज रोहित्र बंद असल्याने शुक्रवार - शनिवारची रात्रभर गाव अंधारात होते. शनिवारी सकाळी महावितरण कंपनीचे शाखा अभियंता एस. डी. घुले यांच्या सांगण्यावरून लाईनमन बाबुराव तिडके यांनी शेतकरी शंकर ईरमले यास बोलावून घेतले. विद्युत पुरवठा खंडित न करता लाइनमन तिडके यांनी ईरमले यांना दुरुस्तीसाठी रोहित्रावर चढविले. दुरुस्तीचे काम सुरु असताना वीजेचा धक्का लागून शंकर ईरमले खाली पडले. या वेळी लाईनमनने तेथून पळ काढला. या वेळी गावातील तरुणांनी शेतकऱ्यास उपचाऱ्यासाठी धारूर येथे आणले. तपासणीनंतर डॉक्टरांनी मयत शंकर ईरमले यास मृत घोषित केले.

शेतकऱ्याच्या मृत्यूस शाखा अभियंता व लाईमन दोषी आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. गुन्हा नोंद करण्यासाठी नातेवाईकांनी शेतकऱ्यांचे प्रेत तीन तास पोलीस ठाण्यात ठेवले. या वेळी जहागिरमोहा गावातही मोठा जमाव जमला. मयताचे भाऊ मच्छींद्र इरमले यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात शाखा अभियंता एस. डी. घुले व लाईनमन बाबुराव तिडके यांच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा नोंद केल्यानंतर नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेतले.

प्रकाश काळे

Web Title: death of the farmer while repairing the power rotator