देवळाई चौकात कंटेरनखाली चिरडून गर्भवती महिलेचा मृत्यू

मनोज साखरे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

देवळाई सिग्नलवर कंटेनरला दुचाकी धडकून गर्भवती महिला चाकाखाली चिरडून ठार झाली. तर महिलेचा दुचाकीस्वार पती किरकोळ जखमी झाला. हा गंभीर अपघात मंगळवारी (ता. 7) सकाळी दहाच्या सुमारास झाला. 

औरंगाबाद : देवळाई सिग्नलवर कंटेनरला दुचाकी धडकून गर्भवती महिला चाकाखाली चिरडून ठार झाली. तर महिलेचा दुचाकीस्वार पती किरकोळ जखमी झाला. हा गंभीर अपघात मंगळवारी (ता. 7) सकाळी दहाच्या सुमारास झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता विठ्ठल आल्हाट (वय 27, रा. सोनवाडी, ता. पैठण जि. औरंगाबाद) असे मृत महिलेचे नाव आहे. ती दोन महिन्यांची गर्भवती होती. नियमित तपासणीसाठी पती विठ्ठल आल्हाट यांच्यासोबत दुचाकीने औरंगाबादेत आल्या होत्या. रुग्णालयातील काम आटोपून दोघे दुचाकीने पैठणला जाण्यासाठी निघाले.

शिवाजीनगरमार्गे ते सकाळी दहाच्या सुमारास देवळाई चौकात आले. पिवळा दिवा लागल्याने त्यांनी दुचाकी जोरात नेली. त्याचवेळी पैठणकडे जाणाऱ्या कंटेनरला दुचाकी धडकली. यानंतर दोघे दुचाकीवरुन खाली कोसळले. चाकाखाली आल्याने अनिता आल्हाट या चिरडल्या गेल्या. या अपघातानंतर लगेचच स्थानिक नागरिक तसेच पोलिसांनी धाव घेत दोघांना घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु अनिता यांना डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. घटनास्थळाहून पोलिंसांनी अपघातग्रस्त वाहने जप्त केली. या घटनेची तूर्तास सातारा पोलिस ठाण्यात नोंद झाली. 

Web Title: Death of a pregnant woman after a container rashed at Devlai Chowk