औरंगाबाद कारागृहात बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू (व्हिडिओ)

मनोज साखरे
रविवार, 20 जानेवारी 2019

- कारागृह अधिकाऱ्यांवर खूनाचा गुन्हा नोंदवा 
- नातेवाईकांचा पावित्रा
-  मृतदेह घेण्यास नकार 

औरंगाबाद : हर्सूल कारागृहात बेदम मारहाण झाल्याने न्यायालयीन कोठडीतील एका संशयित तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूस जबाबदार कारागृह अधिकारी, कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी संतप्त नातेवाईकांनी केली. आंदोलन करुन मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. यामुळे घाटीत तणाव निर्माण झाला आहे. 

पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, योगेश रोहीदास राठोड (वय 36) असे मृताचे नाव आहे. तो गवंडी काम करीत होता. मुळ भारंबा तांडा, ता. कन्नड जि. औरंगाबाद येथील रहिवासी आहे. औरंगाबादेत तो कामानिमित्त राहण्यास आला होता. एका किरकोळ प्रकरणात मयुरपार्क येथील एका महिलेने त्याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. या प्रकरणात त्याच्यावर वॉरंट बजावण्यात आले होते.

वॉरंट तामील झाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सतर जानेवारीला योगेशला हर्सुल कारागृहात नेण्यात आले. तेथे त्याला काही कारणास्तव बेदम मारहाण झाली. यात तो अत्यवस्त झाला. दरम्यान कारागृह प्रशासनाने त्याला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा 19 जानेवारीला रात्री मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात ठिय्या मांडला.

पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी करुन योगेशच्या मृत्यूप्रकरणी कारागृह अधिक्षकांसह जबाबदार अन्य पोलिसांवर खुनाचा गुन्हा नोंदवावा. कुटुंबाला पन्नास लाखांची मदत द्यावी. पत्नीला सरकारी नोकरी द्यावी तसेच प्रकरण सीआयडीकडे वर्ग करावे अशी नातेवाइकांनी मागणी केली. मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नसल्याचा पावित्रा नातेवाईकांनी घेतला. यामुळे घाटीत काही काळ तणाव निर्माण झाला. 

Web Title: Death of youth in Aurangabad jail