अधिकाऱयाला नगरसेवक म्हणाला, 'माझ्या डोक्‍यात घुसू नका...'

माधव इतबारे
सोमवार, 15 जुलै 2019

औरंगाबाद शहरातील समान पाणी वाटपाचा विषय सोमवारी (ता. 15) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा गाजला.

औरंगाबाद - शहरातील समान पाणी वाटपाचा विषय सोमवारी (ता. 15) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा गाजला. शिवाजीनगर, गारखेडा, पुंडलिकनगर भागात एक दिवस गॅप वाढवून हे पाणी कोणत्या भागाला दिले? असा प्रश्‍न सदस्य राजेंद्र जंजाळ यांनी केल्यानंतर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे व श्री. जंजाळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, ''माझ्यासमोर आवाज वाढविल्यानंतर शांत बसणाऱ्यापैकी लेचापेचा नगरसेवक नाही. माझ्या डोक्‍यात घुसू नका. तुमच्यापेक्षा तिप्पट आवाज माझा आहे'', असे सांगत जंजाळ यांनी कोल्हे यांना डिवचले. त्यानंतर त्यांनी आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी सभापतींकडे केली.

 पावसाळा सुरू होऊन सव्वा महिना उलटल्यानंतरही शहरातील पाणीटंचाई दूर झालेली नाही. मोठे पाऊस झाले नसल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नाथसागराची पाणी पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. त्यात काही भागात चार-पाच दिवसांआड तर काही भागात आठ-आठ दिवसाला पाणी मिळत असल्याने राज्यमंत्री अतुल सावे यांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासोबत बैठक घेत समान पाणी देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने गारखेडा, शिवाजीनगर, पुंडलीकनगरसह इतर भागाचा पाणीपुरवठा चार दिवसाआड वरून पाच दिवसाआड करण्याचा निर्णय घेत हे पाणी ज्या भागात सात दिवसाआड पाणी दिले जाते, त्या सिडको-हडको, मुकुंदवाडी, रामनगर, चिकलठाणा या भागाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आठ दिवस उलटले असले तरी माझ्या वॉर्डात तब्बल आठ दिवसालाच पाणी आले अशी तक्रार सदस्य सत्यभामा शिंदे यांनी केली. त्यावर राजेंद्र जंजाळ व नासेर सिद्दिकी यांनी समान पाणी वाटपाचे काय झाले? असा सवाल केला.

कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सिडकोत काही भागाला पाच दिवसाआड पाणी दिले आहे. शिंदे यांच्या वॉर्डात पुढच्यावेळी पाच दिवसाला पाणी येईल, असे आश्‍वासन दिले. त्यावर जंजाळ यांनी आक्षेप घेतला. गेल्या आठ दिवसात कपात केलेले पाणी गेले कुठे? असा प्रश्‍न त्यांनी केला. त्यावर कोल्हे यांनी जसे पाणी उपलब्ध होईल तसे दिले जाईल, असे सांगितले. नाथसारातून पाणी आणण्याची जबाबदारी कोणाची आहे? तुमच्या हातात तीन दिवसाचे चार दिवस, चारचे पाच पाच-दहा करणे, एवढेच काम आहे का? बेकायदा नळावर कोण कारवाई करणार? मोहीम मध्येच का थांबली? पाणी गळती कोणी रोखायची? पाणीपट्टी शंभर टक्के का वसूल केली जात नाही? अशा प्रश्‍नांची सरबत्ती जंजाळ यांनी केली. त्यावर कोल्हे यांचाही आवाज वाढला. सभापतीच्या मध्यस्थीनंतर दोघांतील वाद मिटला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Debate between Corporator and Officer in AMC