ऊसतोड कामगारांच्या धर्तीवर शेतमजुरांबाबत निर्णय घ्यावा: खासदार राजीव सातव

Rajiv Satav.
Rajiv Satav.

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील शेतमजूर, बांधकाम कामगार मोठ्या शहरात अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्यात ऊसतोड कामगारांच्या धर्तीवर शेतमजूर, बांधकाम कामगाराबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार राजीव सातव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

राज्यातील ऊसतोड कामगारांना काही वैद्यकीय चाचण्या करून त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय चांगला आहे. ऊसतोड कामगारांसोबतच विविध जिल्ह्यांतील, विशेषतः हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकरी व शेतमजूर हळद काढणी व इतर शेतीच्या कामासाठी ऑक्टोबर महिन्यापासून स्थलांतरीत होतात.

मोठ्या शहरांत स्थलांतर 

 अनेकजण नाशिक, मुंबई, हैदराबाद, पुणे आदी मोठ्या शहरांत कामासाठी स्थलांतर करतात. काही मजूर बांधकाम क्षेत्रात तसेच वीटभट्टीवर काम करण्यासाठीही जातात. त्यानंतर मार्च महिन्यात हे मजूर परत गावाकडे परततात. या वर्षीही मोठ्या संख्येने मजूर बाहेरगावी कामाला गेले आहेत.

 संचारबंदीमुळे पडले अडकून

 मात्र, आता संचारबंदीमुळे मजुरांना परत गावाकडे येता आले नाही. शेतकरी व शेतमजूर बाहेर जिल्ह्यांत तसेच बाहेर राज्यात अडकून पडल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लॉकडाउनमुळे या मजुरांचा रोजगार बुडाला आहे. शिवाय हाताला काम नसल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

तातडीने निर्णय घ्यावा

त्यामुळे राज्य शासनाने ऊसतोड कामगारांच्या धर्तीवर शेतीकाम, बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी करून त्यांना मूळ गावी परत आणण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार ॲड. राजीव सातव यांनी केली आहे. शेतकरी व शेतमजूर गावी परतल्यानंतर त्यांना खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी करता येणार आहे. त्यामुळे या बाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

मजुरांच्या हाताला कामे द्या: मयुर कयाल
 
हिंगोली : लॉकडाउनमुळे मजुरांची कामे बंद झाली आहेत. हाती कामे नसल्याने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याची सीमा बंद ठेवून लॉकडाउनमध्येही सोशल डिस्टन्स पाळत मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे मत कंत्राटदार मयुर कयाल यांनी व्यक्त केले.

सहा जण कोरोनाबाधित

महिनाभरापासून लॉकडाउन सुरू आहे. शहरात आयोलेशन वार्डात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी अधिक होत आहे. एका पॉझिटिव्ह रुग्णावर योग्य उपचार केल्याने तो ठणठणीत बरा झाला. मात्र, मुंबई व मालेगाव येथून परत आलेल्या येथील एसआरपीचे सहा जवान पॉझिटिव्ह निघाले आहेत. 

शासनातर्फे अन्नधान्याचे वाटप

कोरोनची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन करणे महत्वाचे आहे. तसेच जिल्ह्याची सीमा बंद झाल्याने कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होणार आहे. मात्र, लॉकडाउनमुळे अनेकांच्या हाताला कामे नाहीत. हातावर पोट असणारे अनेक हात अचडणीत आले आहेत. त्‍यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनातर्फे त्‍यांना अन्नधान्याचे वाटप केले जात आहे.

रस्‍त्‍यांची कामे थांबविली

 मात्र, भविष्याचा विचार करून अनेकजण हाती चार पैसे ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु, आता हाताला कामच उपलब्ध नसल्याने रोजमजुरी करणाऱ्यांसह, मॅकेनिक, छोटे व्यावसायिकांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने सुरू असलेल्या अनेक रस्‍त्‍यांची कामे थांबविली आहेत. येथे काम करणारे मजूरही अडचणीत आहेत. 

कामे सुरू करणे अपेक्षित 

त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन सुरूच ठेवत सीमा बंद करून जिल्‍ह्यांतर्गत कामे सोशल डिस्‍टन्स पाळत सुरू केल्यास मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. कंत्राटदारांनादेखील कामे मिळून शासनाला त्‍यापासून महसूल मिळणार आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन ही कामे सुरू करणे अपेक्षित आहे. कामे देताना सर्वांना नियमाचे बंधन करणे अनिवार्य करावे, शासनाच्या अटी व नियमांचे पालन करूनच ही सर्व कामे केली जातील, असा विश्वास श्री. कयाल यांनी व्यक्त केला.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com