वाफसा न झाल्याने रब्बीच्या पेरणीला विलंब

राजेंद्रकुमार जाधव
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकरी हताश 

उस्मानाबाद : पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणच्या जमिनीतील वाफसा अद्यापही झाला नाही. पावसाने जमिनीत मोठ्या प्रमाणात तण उगवल्यामुळे रब्बीच्या पेरणीला विलंब होत आहेत. खरिपाचे उत्पन्न अद्यापही हाती नाही. त्यामुळे तण काढणे, पेरणीसाठी बियाणे व खतांसाठी पैशांची जुळवाजुळव करण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे. 

जिल्ह्यात ऑक्‍टोबर महिन्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोयाबीन, मका, कापूस या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. गेल्या आठवडाभरापासून पावसाने उघडीप दिली आहे; परंतु अनेक ठिकाणची पिके अद्यापही पाण्यात आहेत. जमिनीतील पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत आहेत. जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात तण उगवले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या पिकाची काढणी रखडली आहे. पाणी, चिखलातून सोयाबीनचे पीक काढून ते वाळण्यासाठी पसरविण्याचे काम सुरू आहे. सोयाबीनची काढणी करून ढिगारे केलेले शेतकरी सोयाबीनची मळणी करीत आहेत; परंतु त्यासाठीही मशीन मिळत नसल्याचे चित्र आहे.

इम्तियाज जलील म्हणतात - भाजपचेच सरकार येईल

सोयाबीनच्या मळणीची कामे केव्हाही करता येतील; परंतु दरम्यानच्या कालावधीत रब्बीची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड असली तरी जमिनीचा वाफसा होण्याची त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. वाफसा झाल्यानंतर तण काढून पेरणी करावी लागणार आहे. सध्या काही शेतकऱ्यांच्या जमिनीतील वाफसा झाला असून, तण काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. बहुतांश शेतकऱ्यांचा कल तणनाशकाची फवारणी करण्याकडे आहे. यासाठीही एकरी एक हजार शंभर रुपयांपेक्षा अधिक खर्च करावा लागत आहे. ट्रॅक्‍टरने मशागत करून तण काढण्याचा काही शेतकरी प्रयत्न करीत आहेत; मात्र त्यासाठी ट्रॅक्‍टरचे एकरी भाडे, शिवाय तण वेचणीसाठी मजुरांचा खर्च वाढत आहे. यामुळे यंदा रब्बीची पेरणी लांबणीवर गेली आहे. ज्वारीची पेरणी केली तरी अपेक्षित उतारा मिळणे शक्‍य नसल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा कल हरभरा पेरणीकडे आहे. 

गेल्यावर्षी रब्बीच्या पेरणीपूर्वी अपेक्षित पाऊस झाला नव्हता. त्यामुळे 74 टक्के क्षेत्रातच पेरणी झाली होती. यंदा परतीचा पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे; मात्र सलगच्या पावसामुळे पेरणीला विलंब होत गेला. परिणामी ज्वारीची पेरणी विलंबाने केल्यास उत्पन्नात घट येण्याच्या शक्‍यतेमुळे अनेक शेतकऱ्यांचा कल गव्हाच्या पेरणीकडे वाढत चालल्याचे चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delayed sowing of rabbis