साहेब आभाळ फाटलया... सरसकट पिकाचा पसा हिरावलाय ..

kapus.jpg
kapus.jpg

नांदेड : साहेब आभाळ फाटलंय.. शेतात काहीच उरलं नाही, सरसकट पिकाचा पसा हिरावलाय बघा असा टाहो नांदेड तालुक्यातील पासदगाव, भालकी आणि नांदुसा या गावांतील अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांनी फोडला. हातात बाधीत खरिप पिकं घेवून बांधावर आलेल्या यंत्रणेकडे त्यांनी ही व्यथा रविवारी (ता. 3) मांडली.

परतीच्या मुसळधार पावसाने जिल्हाभरात हाहाकर उडवला, अतिवृष्टीमुळे काढणीला आलेल्या खरिप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासन निर्देशानुसार रविवारी (ता. 3) पंचायत समितीचे सभापती सुखदेव जाधव, उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, गटविकास अधिकारी यू. डि. तोटावाड, विस्तार अधिकारी जीवन कांबळे यांनी तालुक्यातील पासदगाव, भालकी, नांदूसा शिवारात बांधावरुन पिक नुकसानीची पाहणी केली.

दरम्यान, अतिवृष्टीने शेत शिवारात काढणीला आलेल्या सोयाबीन, कापुस आदी खरिप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हंगामातील सुरवातीच्या पेऱ्याचे सोयाबीनची कापणी नुसार बहूतांश शेतकऱ्यांनी गंजी लावल्या. कमी अधिक फरकाने उशीरा पेरणीतील साेयाबीनची शेतकऱ्यांनी पावसाच्या झडीमध्ये कापणी केली. मात्र सततच्या पावसामुळे शेत शिवारास तळ्याचे स्वरुप आल्याने सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटले आहेत.

दरम्यान, हंगामानुसार पहिल्या वेचणीला आलेला कापूस अतिवृष्टिने झाडावर दोड्यातून जमिनीवर लोंबला. सततच्या पावसामुळे झाडावरच्या दोडीतच सरकीला मोड फुटल्याने शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याचे उत्पादनच डागाळले. शेतात उभ्या ज्वार पिकाचे कनिस काळे पडून आता त्यालाही कोंब फुटत आहेत. या शिवाय भुईमुगासह तीळ, काऱ्हाळ, भगर आदी तृण धान्य पिकांचे तर अस्तीत्व शाेधण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

तसेच अतिवृष्टिने हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास हिरावल्याने शेतकरी आर्थिक सकंटात सापडला असून, जिल्हाभरात आेला दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाईची मागणी जाेर धरत आहे. दरम्यान शासनस्तरावरुन प्रशासकीय यंत्रणेला प्रत्यक्ष पहाणीद्वारे पंचनामे करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा व तालुकास्तरावरील शासकिय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्याने रविवार (ता. 3) जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालयाच्या यंत्रणेने तालुक्यातील बाधीत क्षेत्रातील शेतशिवारांना भेटी देत संकटग्रस्त शेतकऱ्यांशी बांधावर संवाद साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com