'मराठा समाजाच्या मागण्यांसाठी एकजूट कायम ठेवावी लागेल'

राजेभाऊ मोगल
रविवार, 14 जुलै 2019

राज्यातील 44 तरुणांनी बलिदान दिले. या सर्वांचे स्मरण करीत त्यांना मराठा क्रांती मोर्चातर्फे शनिवारी (ता.13) श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यापुढेही समाजाच्या मागण्यासाठी एकजूट कायम ठेवावी लागेल, असा निर्धार करण्यात आला. 

औरंगाबाद - कोपर्डीतील घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजाने नऊ ऑगस्ट 2016 ला इतिहासातील पहिलाच मूक मोर्चा येथून काढला. पीडित भगिनीला न्याय मिळावा, यासह अन्य मागण्यांसाठी तब्बल अडीच वर्षांहून अधिक काळ आंदोलने सुरू ठेवली. त्यानंतर आरक्षणाचा लढ्याने वेगळे वळण घेतले. यात राज्यातील 44 तरुणांनी बलिदान दिले. या सर्वांचे स्मरण करीत त्यांना मराठा क्रांती मोर्चातर्फे शनिवारी (ता.13) श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यापुढेही समाजाच्या मागण्यासाठी एकजूट कायम ठेवावी लागेल, असा निर्धार करण्यात आला. 

सिडकोतील शिवछत्रपती महाविद्यालयाच्या मैदानावर श्रद्धांजलीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर समन्वयकांनी सभागृहात आंदोलनाचा मागोवा घेतला. आगामी वाटचाल कशी असावी, याबाबत आपले मत नोंदवले. आपापले अनुभव मांडले. क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणाले, मराठा समाजाचे सुरवातीला शांततेच्या मार्गाने मूक मोर्चे निघाले; मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने समाज आक्रमक झाला. सरकारकडून मोर्चे रोखण्याचेही प्रयत्न झाले; पण ते समाजाने हाणून पाडले. अडीच वर्षांहून अधिक काळ शांततेत नंतर ठोक मोर्चे निघाले. तरीही सरकारकडून दुर्लक्षच करणे सुरू होते; मात्र येथील आंदोलनादरम्यान 23 जुलै 2018 ला कायगाव येथील पुलावरून काकासाहेब शिंदे यांनी आपले बलिदान दिले. त्यानंतर बलिदानाचे सत्र थांबता थांबेना झाले होते. समाजातील तरुणांच्या बलिदानानंतर जाग आलेल्या सरकारने आरक्षण घोषित केले. त्यानंतर काही कथित समाजसेवक या आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात गेले; पण न्यायालयातही समाजाने हा लढा जिंकला. 

27 जूनला मुंबई उच्च न्यायालयाने टक्‍केवारीत घट करीत आरक्षण घोषित केले. हे आरक्षण सहज मिळाले नाही. त्यासाठी तारुण्याच्या उंबरठ्यावरील युवकांनी बलिदान दिले, याचे भान आपल्याला ठेवावे लागेल, अशा भावना व्यक्‍त केल्या. कोपर्डीतील भगिनीला अद्यापही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे यापुढे न्यायालयीन लढाही नेटाने लढला जाईल, असा निर्णय घेण्यात आला. 

सदस्य नोंदणीला सुरवात
मराठा क्रांती मोर्चातर्फे शनिवारपासून सदस्य नोंदणी अभियानास सुरवात करण्यात आली. घराघरापर्यंत पोचण्यासाठी, समाजातील गरजुवंताना मदत करण्यासाठी संघटन उभे राहावे, त्यांना सहज मदत करता यावी, यासाठी ही नोंदणी असेल. या माध्यमातून समाजातील समस्यांचीदेखील उकल होईल, असे यावेळी सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The demands of Maratha community Need to maintain unity