उमरगा : ज्येष्ठ नेते शिवाजीराव चालुक्य यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

शेतकरी हाच समाजजीवनाचा केंद्रबिंदू समजून सर्वोपरी मदत करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकरी, दलित, कुटुंबांतील नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

उमरगा (उस्मानाबाद) : उमरगा तालुक्‍यातील ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव प्रतापराव चालुक्‍य (वय 67) यांचे गुरूवारी (ता.23) दुपारी साडेबाराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी (ता. 24) सकाळी नऊ वाजता मुळज (ता. उमरगा) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या मुळज येथील चालुक्‍य घराण्यात शिवाजीराव चालुक्‍य यांचे नेतृत्व उदयाला आले. घाटबोरुळ (ता. बसवकल्याण) येथे 29 सप्टेंबर 1953 रोजी शिवाजीराव चालुक्‍य यांचा जन्म झाला. परभणी येथे बीएस्सी (कृषी) पदवीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. वडील (कै.) प्रतापराव चालुक्‍य यांनी तालुक्‍याचा राजकारणावर निर्माण केलेली पकड शिवाजीराव चालुक्‍य यांनी कायम ठेवली होती.

शेतकरी हाच समाजजीवनाचा केंद्रबिंदू समजून सर्वोपरी मदत करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकरी, दलित, कुटुंबांतील नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सामाजिक कार्य करत लोकप्रियता मिळविलेल्या शिवाजीराव चालुक्‍य यांना राजकीय वलय प्राप्त झाले. 

का वाढलाय ऑनलाईन वीजबिल भरणा 

जिल्हा बॅंकेवर सातत्याने वर्चस्व निर्माण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला गेला. शिवाजीराव म्हणजे एक लोकन्यायालय असे समीकरणच झाले होते. समाजातील कुटुंबात अनेक कारणांनी निर्माण झालेले वाद त्यांच्या लोकन्यायालयात सामंजस्याने मिटत असत. 

राजकीय प्रवास ... 

शिवाजीराव चालुक्‍य यांनी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून प्रदीर्घ काम केले. नाईचाकूर गटातून जिल्हा परिषद सदस्य, किल्लारी (ता. औसा) येथील शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे उपाध्यक्ष, श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, शिवशक्ती साखर कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा मजूर संस्थेचे अध्यक्ष अशा विविध पदांवर कार्य केले.

राजकारण थांबवा, विकासाचे काय ते बोला

पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भगिनी रूपाताई पाटील-निलंगेकर यांना लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडूण आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले. भाचे माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या राजकारणाला शिवाजीराव चालुक्‍य यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र ऍड. अभयराजे चालुक्‍य जिल्हा परिषदेत अर्थ व बांधकाम सभापती झाले. दुसरे सुपुत्र हर्षवर्धन चालूक्‍य हेही राजकारणात सक्रिय आहेत.

आंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट पाहायचेत? चला औरंगाबादला! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demise of Shivajirao Chalukya Umarga Osmanabad News