नारेगावात पंचवीस एकरांवरील  बेकायदा प्लॉटिंग भुईसपाट 

औरंगाबाद - तारेचे कुंपन जेसीबीच्या माध्यतून काढण्यात आले.
औरंगाबाद - तारेचे कुंपन जेसीबीच्या माध्यतून काढण्यात आले.

औरंगाबाद - नारेगाव, ब्रिजवाडी शिवारात महापालिकेने मंगळवारी (ता. 12) पुन्हा एकदा मोठी कारवाई करून सुमारे 25 एकरांवरील बेकायदा प्लॉटिंग भुईसपाट केली. या ठिकाणी करण्यात आलेले तारेचे कुंपण, सिमेंट रस्ते, विद्युत पोल, ड्रेनेजलाइन जेसीबीच्या साहाय्याने उखडून काढण्यात आली. महापालिकेच्या कारवाईमुळे भूखंड माफियांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. 

शहर परिसरात बेकायदा प्लॉटिंगचे पेव फुटले आहे. ग्रीनबेल्टमध्ये विनापरवानगी सिमेंट रस्ते, ड्रेनेजलाइन, पथदिवे लावून सर्वसामान्य नागरिकांना प्लॉट विक्रीचा भूखंड माफियांनी धडका लावला आहे. विशेषतः नारेगाव, चिकलठाणा, पडेगाव, मिटमिटा, हर्सूल, सातारा-देवळाई, बीड बायपास या भागांत मोठ्या प्रमाणात बेकायदा प्लॉटिंग टाकून ते सर्वसामान्यांना विक्री केले जात आहेत. महापालिका प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने भूखंड माफियांना मोकळे रान मिळाले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महापालिकेने कारवाया सुरू केल्या असून, मंगळवारी पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव पथक सकाळी सहा वाजताच या भागात पोचले. त्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत ब्रिजवाडी गट क्रमांक चार ते आठ व नारेगाव शिवारातील गट क्रमांक 25 मधील बेकायदा प्लॉटिंग उद्‌ध्वस्त करण्यात आली. या कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त मिळावा, असे पत्र महापालिकेने यापूर्वी अनेकवेळा पोलिसांना दिले; मात्र मंगळवारी पोलिस निरीक्षक बहुरे यांच्यासह केवळ चार कर्मचाऱ्यांचा ताफा मिळाला; मात्र महापालिकेकडे असलेल्या माजी सैनिकांच्या बळावर ही कारवाई करण्यात आली.

सकाळीच कारवाई सुरू करण्यात आल्याने कोणाचाही विरोध झाला नाही. दरम्यान, एका गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्याने महापालिकेकडे तारेच्या कुंपणासाठी परवानगी मागितली, ती देण्यात आली नाही. कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला. न्यायालयाचे मनाई आदेश आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला; मात्र त्यापूर्वीच महापालिकेने मोहीम फत्ते केली होती. 
 

पुढे कारवाई, मागे अभय 
नारेगाव मुख्य रस्त्यालगतच ग्रीनबेल्टमध्ये मोठमोठे रस्ते तयार करून जमिनीवर प्लॉटिंग टाकून भूखंड विक्री केले जात आहेत. महापालिकेच्या पथकाने याच रस्त्यावरून पुढे जात कारवाई केली; मात्र ही प्लॉटिंग शिवसेनेच्या एका नेत्याशी संबंधित असल्याने त्यावर कारवाई करण्यात आली नाही. यासंदर्भात विचारणा केली असता, त्या जागेत खुट्टे आढळून आले नाहीत, शेतीसाठी रस्ते केले असावेत, अशा दावा अधिकाऱ्यांनी केला. 
 

"कुठे-कुठे कारवाई करणार?' 
नारेगाव परिसरात बेकायदा प्लॉटवर हजारो बेकायदा घरे, पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहेत. आजघडीला शेकडो बेकायदा बांधकामे सुरू आहेत. बांधकामांचा आवाका व महापालिकेचे पथक पाहता, आभाळच फाटलेले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. आता ते कुठे कुठे शिवणार, कुठे कारवाई करणार?, असा प्रश्‍न नागरिकांमधून केला जात होता. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com