सर्दी, खोकल्याची साथ अन्‌ डेंगीनेही काढले डोके वर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

जोराचा पाऊस पडला तर साचलेली घाण वाहत्या पाण्याबरोबर निघून जाते; मात्र शहरात ही घाण वाहून नेण्यासारखा धो धो पाऊस झाला नसल्याने डास आणि माशांचे प्रमाण वाढले आहे. या डासांसोबतच शहरात साथरोगाची सुरवात झाली आहे, तर दुसरीकडे महापालिकेचा आरोग्य विभाग उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद - जोराचा पाऊस पडला तर साचलेली घाण वाहत्या पाण्याबरोबर निघून जाते; मात्र शहरात ही घाण वाहून नेण्यासारखा धो धो पाऊस झाला नसल्याने डास आणि माशांचे प्रमाण वाढले आहे. या डासांसोबतच शहरात साथरोगाची सुरवात झाली आहे, तर दुसरीकडे महापालिकेचा आरोग्य विभाग उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. 

शहरात गेल्या आठवड्यापासून डायरियाच्या रुग्णांची संख्या वाढत असून, सध्या १३८ जण डायरियाने त्रस्त झाले आहेत. याशिवाय डासांमुळे गेल्या महिन्यात डेंगीचे पाच पॉझिटिव्ह तर दोन संशयित रुग्ण आढळले आहेत. 
जागोजाग पडलेला कचरा पावसात भिजल्याने कुजून त्याची दुर्गंधी येत आहे. याच कुजलेल्या कचऱ्यावर पावसाळ्यात वाढणाऱ्या माशा बसतात आणि त्या साथरोगाचा प्रसार करत आहेत. पावसाळा सुरू होताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने साथरोग प्रतिबंधासाठी ॲबेटिंग, औषध फवारणी, धूर फवारणी करणे आवश्‍यक आहे. मात्र, महापालिकेचा आरोग्य विभाग जनजागृती केल्याचा आव आणत कागदी घोडे नाचविण्याचे काम करत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर नंदकुमार घोडेले यांनी दोन दिवसांपूर्वीच आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली. जूनमध्येच शहरात डेंगीचे पाच रुग्ण आढळले आहेत, तर दोन संशयित सापडले आहेत. डायरियांच्या रुग्णांतही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्यात डायरियांच्या रुग्णांची संख्या ही ८० होती, ती आता १३८ वर पोचली आहे. सर्दी, खोकल्याचीही शहरात साथ सुरू आहे.

आजघडीला शहरात सर्दी, खोकल्याचे ३४५ रुग्ण आढळले आहेत. ही केवळ महापालिकेच्या आरोग्य विभागाने सादर केलेली आकडेवारी असून, प्रत्यक्षात यापेक्षा रुग्णसंख्या जास्त असण्याची शक्‍यता आहे. डासांची उत्पत्ती व माशांची संख्या कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्‍यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अपेक्षित आहे. प्रत्येक वॉर्डात औषध फवारणी, ॲबेटिंग, फॉगिंग करणे आवश्‍यक आहे. 

मात्र, महापालिकेच्या आरोग्य विभागाने केवळ डेंगीचा रुग्ण आढळला तरच अशा ठिकाणी फवारणी करण्याचा पायंडा सुरू केला आहे. अबेटिंगही नियमित होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue Patient Increase in Aurangabad Healthcare