फुलंब्रीत डेंगीच्या आजाराचे थैमान

फुलंब्रीत डेंगीच्या आजाराचे थैमान

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : फुलंब्री शहरासह परिसरात डेंगीची लागण झालेली आहे. सध्या ग्रामीण रुग्णालयात तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महिनाभरात तब्बल तीस रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. डेंगीच्या आजाराची तीव्रता वाढल्याने आतापर्यंत तीन रुग्णांना औरंगाबादेतील "घाटी' रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात एक ऑक्‍टोबरपासून आतापर्यंत केवळ वीस दिवसांत तीस रुग्णांवर उपचार करण्यात आले. यात तीन रुग्ण जास्त गंभीर अवस्थेत असल्याने त्यांना "घाटी'त पाठविण्यात आले. तालुक्‍यातील खासगी रुग्णालयांतही डेंगीसदृश आजाराने त्रस्त रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात हव्या तशा सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. डेंगीची लागण झालेल्या रुग्णांची चाचणी करण्याची सुविधा ग्रामीण रुगणालयात नसल्याने त्यासाठी खासगी पॅथलॅबचा सहारा घ्यावा लागत आहे. ही चाचणी खर्चिक असल्याने गोरगरीब रुग्णांची आर्थिक कुचंबणा होत आहे.

बाराशे ते पंधरा रुपयांत होणारी ही चाचणी खासगी पॅथलॅबमध्ये उपलब्ध आहे; परंतु ग्रामीण रुग्णालयात अल्पदराची सुविधा असल्याने रुग्णांना बाहेरून खासगी पॅथलॅबचा सहारा घ्यावा लागत आहे. ग्रामीण रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधा अपुऱ्या असल्यामुळे नाइलाजाने रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांना खासगी दवाखान्यांत उपचार घ्यावे लागत आहेत. डेंगीसारख्या आजारासाठी ग्रामीण रुग्णालयात सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आहे.


सध्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्‌सचे कमी-जास्त प्रमाण आढळत आहे. दरम्यान, ताप, नाकातोंडातून रक्तस्राव, रक्ताची उलटी, मळमळ, दमा, अन्नपचन न होणे असे काही जाणवल्यास तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे. अशावेळी रुग्णांच्या शरीरातील पाणीपातळी वाढविणे गरजेचे आहे. उच्चपातळीचा पोषण आहार रुग्णांनी नियमित घेणे आवश्‍यक आहे.

जनजागृती मोहिमेत सर्वांनी सहागी व्हावे
फुलंब्री शहर हे जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येत असल्याने सर्व डेंगी आजाराविषयी जनजागृती करण्याचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. यात डेंगीची लागण होऊ नये म्हणून जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांच्या परिसराची स्वच्छता करणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे, कीटकनाशक फवारणी करणे, कोरडा दिवस पाळणे आदी उपाययोजना सुरू आहेत. डेंगीच्या बाबतीत युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तरी या काळात डासांची नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होते. म्हणूनच या व्यापक मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे करण्यात आले आहे.


ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची डेंगीच्या आजाराची लक्षणे दिसून येताच विविध चाचण्या करून प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. वीस दिवसांत फुलंब्रीसह परिसरातील सुमारे तीस रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यातील तीन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना "घाटी'त पाठविण्यात आले. सध्या तिघांवर उपचार सुरू आहेत.
- डॉ. अंगद घुले, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, फुलंब्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com