बीड जिल्हा रुग्णालयाची अवस्था पाहून उपसंचालक संतापले 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 23 June 2020

  • डॉ. एकनाथ माले यांच्याकडून पाहणी 
  • सेवा सुधारण्याच्या सूचना 
  • जिल्ह्यातील आरोग्यसेवेचाही आढावा 

बीड - कोरोना महामारीचा सामना करताना इतर सार्वजनिक आरोग्य सुविधांचा जिल्ह्यात पुरता बोजवारा उडाला आहे. स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात तर कशाचाच पायपोस नाही. अलीकडच्या काळातील सिव्हिलमध्ये उपचारावरून घडलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. २३) आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी स्थलांतरित जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. जिल्हा रुग्णालयाची अवस्था पाहून डॉ. माले यांनी चांगलाच संताप व्यक्त करीत उपस्थित अधिकाऱ्यांची कानउघाडणीही केली. 

येथील मूळ जिल्हा रुग्णालयात कोविड हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटर सुरू केल्याने जिल्हा रुग्णालय नाळवंडी नाका भागातील आदित्य डेंटल महाविद्यालयात स्थलांतरित करण्यात आले. तेव्हापासून जिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उंटावरून शेळ्या, उपकरणांची कमतरता अशा प्रकारांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी अपघातातील दोन तरुण उपचाराविना तडफडत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाले. या सर्व प्रकारावरून टीका होत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या लातूर परिमंडळाचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांनी पाहणी करून आढावा घेतला. स्वच्छता व सुविधा पाहून त्यांनी संतापही व्यक्त केला. 
लोकांना सांगे... सॅनिटायझरच नाही 
शासकीय यंत्रणांकडून प्रत्येक कार्यालयाच्या दारात सॅनिटायझर ठेवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. जिल्हा रुग्णालयात मात्र सॅनिटायझर नव्हते ना स्वच्छताही नव्हती. खुद्द डॉ. माले यांनीच ‘सकाळ’ला हा प्रकार सांगितला. याबाबत सूचना दिल्याचेही डॉ. माले म्हणाले. 

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

रुग्णांना महात्मा फुले योजनेचा लाभ द्या 
भेटीनंतर डॉ. एकनाथ माले यांनी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षकांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांत महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू असल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यात पाठवून मोफत महात्मा फुले जनआरोग्य अभियान योजनेतून उपचार मिळवून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयांत ही मोफत उपचार योजना लागू केली आहे. या योजनेमुळे लोकांना चांगल्या व मोफत सेवा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड आदींसोबत बैठक घेऊन आढावा घेत सूचना दिल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Deputy Director got angry seeing the condition of Beed District Hospital