जिथे कचरा संकलन केंद्र तिथेच विकास निधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

लातूर : लातूरकरांच्या सदृढ आरोग्यासाठी जे नगरसेवक आपापल्या प्रभागात कचरा संकलन केंद्र सुरु करणार नाहीत, त्या प्रभागात आयुक्तांनी विकास निधी वितरीत करु नये, अशा सूचना देत पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी नगरसेवकांच्या कामकाजावर अप्रत्यक्षपणे बोट ठेवले. कचऱ्यातून सोने निर्माण करणाऱ्या महिला सफाई कामगारांसाठी लवकरच स्पर्धा घेण्यात येणार असून विजेत्या सफाई कामगारांच्या संपूर्ण कुटुंबाला आवडीच्या ठिकाणी सहलीला पाठविले जाईल, अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली.

शहरातील शासकीय कॉलनीमध्ये जनआधार संस्था आणि पालिकेच्या वतीने निर्माण केलेल्या संत गाडगेबाबा सुका कचरा संकलन व वर्गीकरण केंद्राचे उद्घाटन निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, भूकंप, दुष्काळ ही लातूरची ओळख कायमस्वरुपी पुसून टाकण्यासाठी सकारात्मक पध्दतीने विचार करुन सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन, नागरिकांनी स्वच्छतेमध्ये  जागतिक स्तरावर लातूर शहराची नवी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी सरकारकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल.

स्वच्छ सर्वेक्षणात लातूर शहर देशपातळीवर पहिल्या दहामध्येच आले पाहीजे. लातूर शहराची स्वच्छतेच्या बाबतीत  इतर शहरांशी स्पर्धा असून लोकप्रतिनिधी, प्रशासन, सर्वसामान्य नागरिकांनी एकत्रीत प्रयत्न करुन शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट करावी, असे सांगून निलंगेकर म्हणाले, या केंद्रात दिवसाला एक हजार टन याप्रमाणे 20 दिवसांत 20 हजार टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार असून पूर्वीचा 3 लाख टन कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी प्रशासनाने योग्य नियोजन करुन वेळापत्रक ठरवावे. स्वच्छतेच्या बाबतीत पथदर्शक प्रकल्प राबवून लातूरचा चेहरा-मोहरा बदलावा. लातूरच्या विकासासाठी निधीची कमतरता येऊ देणार नाही.

या वेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, महापौर सुरेश पवार, आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर, प्रविक्षाधिन जिल्हाधिकरी राहुल गुप्ता, उपायुक्त संभाजी वाघमारे, वसुधा फड, प्रभागातील नगरसेविका राघिनी यादव उपस्थित होत्या.

Web Title: development fund only there where waste collection is proper