श्री दाक्षायणी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

अविनाश संगेकर
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

लासूरगाव (ता. वैजापूर) हे शिवना नदीकाठी वसलेले ऐतिहासिक गाव असून, दाक्षायणी देवी मंदिराचा प्राचीन इतिहास, दर्शनासाठी भाविकांची येथे नित्य गर्दी असणारे हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून, भाविक पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी करतात. देवीचा नवरात्रोत्सव विजयादशमीपर्यंत चालणार आहे. शिवना नदीच्या तिरावर वसलेल्या लासूरगावी दाक्षायणी देवीच्या मंदिरासह अष्टविनायकाची आठ मंदिरे आहेत.

लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : लासूरगाव (ता. वैजापूर) हे शिवना नदीकाठी वसलेले ऐतिहासिक गाव असून, दाक्षायणी देवी मंदिराचा प्राचीन इतिहास, दर्शनासाठी भाविकांची येथे नित्य गर्दी असणारे हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्र महोत्सवानिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असून, भाविक पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी करतात. देवीचा नवरात्रोत्सव विजयादशमीपर्यंत चालणार आहे. शिवना नदीच्या तिरावर वसलेल्या लासूरगावी दाक्षायणी देवीच्या मंदिरासह अष्टविनायकाची आठ मंदिरे आहेत.

भगवान शंकराचे तीन लिंग आहेत. लासूरगावचा उल्लेख काशीखंड या पुराणात आढळतो. प्रजापती दक्षराजाची दक्षनगरी म्हणून ती ओळखली जाते; तसेच ऐतिहासिक काळात अल्लाउद्दीन खिलजीचा सरदार आणि राजा रामदेवराय यांचा सेनापती यांच्यात झालेल्या चकमकीचे ठिकाण म्हणूनही लासूर खिंडीचा उल्लेख आढळतो. दक्षराजाची कन्या दाक्षायणीने शिवशंकराशी विवाह व्हावा, यासाठी तपोव्रत केले. दक्षराजाने दाक्षायणीचा विवाह शिवाशी करून दिला. दक्षराजाने एका यज्ञासाठी शिव-पार्वतीस बोलावले नाही; तरीही माहेरच्या ओढीने पार्वती नंदिकेश्वरास सोबत घेऊन आली; पण येथे उपेक्षा व पतीनिंदा सहन न झाल्याने पार्वतीने यज्ञात उडी घेतली व शिवतत्त्वात विलीन झाली. त्यानंतर शंकराचे व दक्षराजाचे प्रचंड युद्ध झाले. शंकराने दक्षाचा शिरच्छेद केला. नंदिकेश्वराने दक्षनगरी उलथवून टाकली. आजही लासूरगावचा काही भाग "पालथीनगरी' म्हणून ओळखला जातो. श्री. देवी दाक्षायणी संस्थानला निजाम सरकारकडून इनामी जमीन मिळालेली आहे. पूर्वी बलुतेदारी पद्धतीतून मंदिराचा व्यवहार चालत असे. स्वातंत्र्यानंतर तहसीलदारांच्या अधिकारात व्यवहार होत होता.

ग्रामस्थांसह इतर भाविकांना मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा असे वाटत होते; परंतु शासनाने अपेक्षापूर्ती न केल्याने ग्रामस्थांनी साखळी उपोषण केले. अखेर या मार्गाने यश मिळून एक धर्मदाय विश्‍वस्त मंच स्थापन करण्यात आला. या मंचाने यशस्वीरीत्या मंदिराचा जीर्णोद्धार घडवून आणला आणि इतर विकासकामेही केली. विश्‍वस्त मंडळाने जीर्णोद्धार करताना मुख्य मंदिराचे बांधकाम, दुकाने, भक्त निवासाची इमारत, दीपमाळ, महादेव मंदिर, मंगल कार्यालय, पाकगृह, चांदीचे सिंहासन, भक्ती साधना केंद्र, संरक्षक भिंत, वाहनतळ आदी विकासकामे केली.
लासूरगावी औरंगाबादहून रेल्वे, बस, खासगी वाहनाने जाता येते. औरंगाबादहून चाळीस किलोमीटर अंतरावर हे श्रीक्षेत्र आहे. यासाठी लासूर स्टेशन येथे यावे. तेथून तीन किलोमीटरवर मंदिर आहे. वैजापूर, गंगापूर येथून तीस किलोमीटर अंतर असून, वेरूळ, खुलताबाद ही धार्मिक, प्रेक्षणीय स्थळे तीस-पस्तीस किलोमीटर अंतरावर आहेत. संस्थानचे पदाधिकारी सुविधा पुरविण्यात पुढाकार घेत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotees Crowd In Dakshayan Devi Temple