धनंजय मुंडे होते, म्हणून हा जवान....

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

रेल्वेला उशीर झाल्याने औरंगाबाद विमानतळावर थोडा उशिरा पोचलेल्या परळी तालुक्‍यातील जवानाचे स्पाईस जेटचे विमान हुकले. आता श्रीनगरला कसे पोचावे, या चिंतेत असलेल्या जवानाची विमानतळावरच मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी भेट झाली अन्‌ मुंडेंनी तत्काळ दुसऱ्या विमानाच्या तिकिटाची व्यवस्था करून दिली. 
 

परळी वैजनाथ (जि. बीड) -तालुक्‍यातील पांगरी येथील जवान सुटी संपवून परत देशसेवेसाठी निघालेले असताना श्रीनगरला जाणारे विमान उशीर झाल्याने चुकले. तितक्‍यात मुंबईला निघालेले मंत्री धनंजय मुंडे यांची अचानक भेट झाली अन्‌ वैभवला श्रीनगरचे दुसऱ्या विमानाचे तिकीट मिळाले.

वैभव मुंडे हे औरंगाबाद येथून दिल्लीमार्गे श्रीनगरसाठी मंगळवारी (ता. 11) सकाळी आठला विमानाने जाणार होते; परंतु औरंगाबादला येणाऱ्या रेल्वेला उशीर झाल्यामुळे विमानतळावर पोचण्यास वैभव मुंडेंना उशीर झाला.

हेही वाचा - आमदारांच्या सासऱ्याचे उपोषण अन तलाठ्यांचे निलंबन....

स्पाईस जेटचे विमान थोडक्‍यात चुकले. बीएसएफ मुख्यालयात वेळेवर न पोचल्यामुळे कारवाईचा सामना करावा लागणार, या चिंतेत विमानतळावरच बसलेल्या जवान वैभव मुंडे यांच्या मदतीस राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अनपेक्षितपणे धावून आले. 

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का? नॉनव्हेजवाल्यानो, वाचा...

बीड जिल्ह्याचा दोन दिवसांचा दौरा आटोपून औरंगाबाद येथून मुंबईकडे निघालेल्या धनंजय मुंडे यांनी विमानतळावर अचानक भेटलेल्या पांगरी येथील या जवानाची आस्थेवाईकपणे चौकशी केली. विमान हुकल्याचा प्रकार कळताच आपल्या कार्यालयामार्फत मुंडेंनी तत्काळ जवान वैभव मुंडेंसाठी एअर इंडियाच्या ए 1442 या विमानाचे औरंगाबाद-दिल्ली-श्रीनगर असे तिकीट काढून दिले. यानंतर जवान वैभव मुंडेंनी सुटकेचा निःश्वास सोडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhananjay Munde Helped A Jawan Army Beed News