‘त्या’ हल्ल्यातील जखमीचा मृत्यू 

प्रल्हाद कांबळे
Thursday, 2 April 2020

जखमी चालक असलेल्या शेख सिराज (वय ३७) याचा उपचारादरम्‍यान तब्बल आठ दिवसांनी म्हणजेच बुधवारी (ता. एक) रात्री मृत्यू झाला. ही घटना शहराच्या मुजाहीद चौक, देगलूरनाका परिसरात बुधवारी (ता. २५) दुपारी चारच्या सुमारास घडली होती.

नांदेड : संपत्तीच्या वादातून दोन सख्या चुलतभावात झालेल्या हाणामारीत चक्क गोळीबार करण्यात आला. यात एकजण ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले होते. यातील जखमी चालक असलेल्या शेख सिराज (वय ३७) याचा उपचारादरम्‍यान तब्बल आठ दिवसांनी म्हणजेच बुधवारी (ता. एक) रात्री मृत्यू झाला. ही घटना शहराच्या मुजाहीद चौक, देगलूरनाका परिसरात बुधवारी (ता. २५) दुपारी चारच्या सुमारास घडली होती. या हल्ल्यात जखमी झालेले दोनजण अजूनही गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

शहरात संचारबंदी असल्याने सर्वत्र स्मशान शांतता होती. परंतु देगलूर नाका भागात मुजाहीद चौक परिसरात झालेल्या गोळीबाराने नांदेड शहर दणाणले होते. पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, खुदबेनगर भागात अली इनामदार (जर्दावाला) व गौस इनामदार या दोन चुलतभावांमध्ये संपतीचा जूना वाद आहे. हा वाद मागील सहा ते सात वर्षापासून धुमसत होता. या भागातील गाडेगाव रस्त्यावर गौस इमानदार यांच्या नातेवाईकाची औषधी दुकान आहे. या दुकानासमोर ता. २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गौस इनामदार व अली जर्देवाला यांच्यात वाद झाला. 

हेही वाचा - घरातून दारात...दारातून घरात प्रवास ठरतोय त्रासदायक, कशामुळे? ते वाचाच

या हल्ल्यातील जखमीचाही मृत्यू

मात्र दुपारी चारच्या सुमारास पुन्हा हे एकामेकासमोर आले. सुरवातीला हाणमारी झाली. त्यानंतर पिस्तुलद्वारे गोळीबार करण्यात आला. यावेळी अली जर्देवाला याचा भाऊ महमद जुनेद (वय ३०) हा गोळी लागल्याने व तलावारीचा जबर वार बसल्याने जागीच ठार झाला. तर दुसरा भाऊ महमद हाजी याच्या पाठीत एक गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. या हल्ल्यात गौस इनामदार व सिराज शेख हे गंभीर जखमी झाले होते. 

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा

या प्रकरणी महमद हाजी याच्या फिर्यादीवरुन युनुस इनामदार, गौस इनामदार, सरवर इनामदार, अनिस इनामदार, हाफिजोद्दीन इनामदार, मुजाहीद इनामदार आणि आदील यांच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, भारतीय हत्यार कायद्यासह आदी कलमान्वये नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी हाफीजोद्दीन इनामदार (वय ७०) यांना अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर उर्वरीत आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले नाहीत.

वाद सोडविणे बेतले जीवावर

वाद सोडविण्यासाठी गेलेल्या सिराज शेख मौला शेख (वय ३७) याच्या पोटात खंजरने भोसकले होते. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर शासकिय रुग्णालय विष्णूपूरी येथे उपचार सुरू होता. मात्र त्याचा उपचारादरम्यान बुधवारी (ता. एक) रात्री मृत्यू झाला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी रात्रीच रुग्णालयाला भेट दिली. या हल्ल्यात जखमी झालेल्या व खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दोघांची प्रकृती चिंताजन असल्याचे पोलिसांनी सांगितले.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Died of injuries in 'that' attack nanded news