पैसे थकल्याने रोखले अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

महापालिकेने बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यसंस्कार योजना नव्याने सुरू केली आहे. मात्र, दोन महिने उलटले तरी स्मशानजोगींच्या नावावर आतापर्यंत केलेल्या अंत्यसंस्काराचे पैसे जमा करण्यात आले नाहीत.त्यामुळे शुक्रवारी (ता. 29) हडको एन-11 येथील स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आला.

औरंगाबाद-महापालिकेने बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यसंस्कार योजना नव्याने सुरू केली आहे. मात्र, दोन महिने उलटले तरी स्मशानजोगींच्या नावावर आतापर्यंत केलेल्या अंत्यसंस्काराचे पैसे जमा करण्यात आले नाहीत. त्यामुळे शुक्रवारी (ता. 29) हडको एन-11 येथील स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आला. शेवटी नातेवाइकांनी पैसे भरल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यात अर्धातास मृतदेह पडून असल्याने महापालिकेच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्तांचे स्वीय सहायक सुनील ढेकळे आणि नगरसेवक नितीन चित्ते यांच्यासमोर हा प्रकार घडला. 

महापालिकेने काही वर्षांपूर्वी मोफत अंत्यसंस्कार योजना सुरू केली होती. अनेकवेळा एखाद्या सामान्य कुटुंबाच्या घरात निधन झाल्यास अंत्यविधीसाठी देखील पैसे नसतात. त्यामुळे पैशासाठी दारोदार भटकण्याची वेळ कुटुंबातील सदस्यांवर येते. ही फरफट थांबविण्यासाठी मोफत अंत्यसंस्कार सुरू करण्यात आले. मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण देत ही योजना तत्कालीन आयुक्तांनी बंद केली. दरम्यान विद्यमान महापौर नंदकुमार घोडेले यांनी मोफत अंत्यसंस्कार योजनेसाठी अर्थसंकल्पात तरदूत करण्याचे आदेश देत योजना पुन्हा एकदा सुरू केली.

वाचावेच असे : काय आहे उदरबस्ती... 

दोन महिन्यांपासून मोफत अंत्यसंस्कार केले जात आहेत. प्रत्येक अंत्यसंस्कारासाठी अडीच हजार रुपये स्मशानजोगींच्या खात्यावर जमा केले जाणार होते. आठवड्याला ही रक्कम दिली जाणार होती. मात्र दोन महिने उलटले तरी पैसे न मिळाल्याने मोफत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असा इशारा शहरातील स्मशानजोगींनी दिला होता. तातडीने थकीत पैसे दिले जातील, असे आश्‍वासन महापौरांनी दिले होते. मात्र पैसे खात्यावर जमा होत नसल्यामुळे शुक्रवारी अंत्यविधी रोखण्यात आला.

हेही क्‍लिक करा : एचआयव्ही नव्हे तर शरीर संबंधातून 

हडको एन-11 येथील स्मशानभूमीत दुपारी साडेचार वाजता एका व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आला. नातेवाइकांनी मोफत अंत्यसंस्कारासाठीची पिवळी पावती सोबत आणली. मात्र आमचे थकीत पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे या योजनेचा लाभ देता येणार नाही, असे सांगत स्मशानजोगीने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. आता पैसे भरा, त्यानंतरच अंत्यसंस्कार होतील असा पवित्रा स्मशानजोगीने घेतला. अर्धातास यावर चर्चा झाल्यानंतर नातेवाइकांनी पैसे भरले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

महापालिकेने मोफत अंत्यसंस्कार योजना सुरू केली मात्र स्मशानजोगींना पैसेही वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे आज अंत्यसंस्कार रोखण्यात आले. हा प्रकार माझ्यासमोरच घडला. मात्र शरमेने मान खाली घालावी लागली. 
नितीन चित्ते, नगरसेवक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Difficulty with the funeral procession