तंत्रस्नेही शिक्षक समूहाची डिजिटल शैक्षणिक चळवळ, कशी? ते वाचाच

प्रमोद चौधरी
शनिवार, 11 एप्रिल 2020

लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांचे ज्ञान अपडेट करण्याच्या हेतूने अॅप्सच्या माध्यमातून ऑनलाईन तंत्रज्ञान कार्यशाळा घेतली जात आहे. त्यासाठी वृषाली खाड्ये, जयराम चव्हाण, राजेश चायंदे, गजानन पुंडे, सुरज कुदळे, संदीप सोनार, जावेद खान, लीला शिवदे यांनी  मार्गदर्शन केले आहे.

नांदेड : लाॅकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ते अभ्यासात गुंतुन रहावेत, यासाठी ई-लर्निंगचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून चाचण्या, उपक्रम, खेळ, शैक्षणिक साहित्य तयार करण्याची संकल्पना काही शिक्षकांनी मांडली. ती प्रत्यक्षात अमलात आणून जिल्हानिहाय ‘तंत्रस्नेही शिक्षक समूह’ तयार करण्यात आला. 

काय आहे समूहात
डाॅ. जितेंद्र लिंबकर हे व्हिडिओद्वारे शारीरिक शिक्षणाचे ज्ञान विद्यार्थ्यांना देत आहेत. आपले सामान्यज्ञान वाढावे यासाठी केबीसी सारखा ऑनलाईन खेळ संदीप सोनार (जळगाव जिल्हा समूह प्रशासक) यांनी तयार केला. या सर्व डिजिटल गोष्टींचा विद्यार्थी व शिक्षकांना फायदा होत आहे. लाॅकडाऊनच्या काळात ई-पेपर व कथा, कादंबरी आदी पुस्तके वाचणा-यांची संख्याही वाढत आहे. वर्तमानपत्र, वाचन संस्कृती जपूया! यासारख्या समुहाद्वारे वाचक आनंद मिळवत आहेत. याकामी नांदेडचे प्रलोभ कुलकर्णी, लातूरचे जागीरदार अ. वहाब अ.नजीब, बुलढाणा येथील राजेश चोपडे हे नियमित ई-पेपर समुहात पाठवत आहेत. वासुदेव पाटील, दिलीप जाने(जळगाव) यांच्या कथा व  भारती डहाळे, सुनीता मोरे यांनी समूहात पाठवलेल्या कथा वाचकांची उत्कंठा वाढत असताना दिसते. 

हेही वाचा - वर्तमानपत्रेच आहे समाजमनाचे खरे ‘प्रतिबिंब’

शिक्षक अपडेट रहावा म्हणून...
शिक्षकांचे ज्ञान अपडेट रहावे, यासाठी समुहातर्फे प्रत्येक मंगळवारी ऑनलाईन चाचणी आयोजित केली जाते. नियोजनानुसार प्रशासक प्रश्नपत्रिका काढून चाचणी प्रमुख भालचंद्र भोळे गुगल फाॅर्मवर पेपर सेट करतात. एक हजारपेक्षा अधिक  शिक्षक सहभागी होतात. स्पर्धेच्या वेळी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना  ई-प्रमाणपत्र दिले जाते. याकामी नाशिकचे सुरज कुदळे आणि कोल्हापूर येथील सुनील द्रवीड यांचे मोठे सहकार्य मिळत आहे.  

शिक्षकांचा मिळतोय प्रतिसाद
अजित तिजोरे (मुंबई) यांचा नियमित एक प्रश्न व गणिताशी संबंधित प्रश्न, अशोक कुमावत (नाशिक) यांची प्रेरणादायी  सकारात्मक विचार मालिका, ज्योती वाघमारे(सोलापूर) यांची नैतिक मूल्ये कथा, जयश्री माने(मुंबई) यांचे ज्ञानकुंभ भाषिक उपक्रम, भालचंद्र भोळे(ठाणे) यांचे टेक्नो न्यूज, सतीश दुवावार(चंद्रपूर) यांचे वैज्ञानिक सदर प्रत्येक आठवड्यात शिक्षकांपर्यत पोहचते. समुहाच्या उपक्रमात शिक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून विद्यार्थीही या काळात Study from home करीत ई लर्निंग करताना दिसतात.

हे देखील वाचायलाच हवे - Video : कोरोनाचा धोका नाही, फक्त खबरदारी घ्यावी : डॉ. मान्नीकर

स्वतः पाचवीसाठी चाचण्या, शैक्षणिक साहित्य तयार केले. इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचा लाभ व्हावा, म्हणून समुहाच्या ब्लाॅगवर जळगावचे संदीप सोनार यांच्या सहकार्याने या चाचण्या अपलोड केल्या आहेत.
- वृषाली खाड्ये (शिक्षिका, बृहन्मुंबई मनपा मराठी शाळा)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Digital Educational Movement of the Technology Group Nanded News