दिग्रसची केळी थेट बांगलादेशात

मंगेश शेवाळकर
सोमवार, 4 जून 2018

कळमनुरी तालुक्यातील दिग्रस येथील शेतकऱ्याने पिकवलेली केळी थेट बांगलादेश येथे रवाना झाली आहे. कळमनुरी येथील गोदाफार्म व अर्धापूर येथील केळीच्या दलालाच्या प्रयत्नाने हे शक्य झाले आहे. 

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील दिग्रस येथील शेतकऱ्याने पिकवलेली केळी थेट बांगलादेश येथे रवाना झाली आहे. कळमनुरी येथील गोदाफार्म व अर्धापूर येथील केळीच्या दलालाच्या प्रयत्नाने हे शक्य झाले आहे. 

कळमनुरी तालुक्यातील दिग्रस येथील शेतकरी बाबुराव गोरे यांच्याकडे वीस एकर शेती आहे. त्यापैकी सात एकर क्षेत्रावर केळीची बाग आहे. 

मागील वर्षी 25 जून रोजी केळीचे टिशू कल्चर रोपे लावल्यानंतर पाण्याचे काटकसरीने नियोजन केले. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले. एप्रिल महिन्यापासून केळीचे घड काढण्यास आले. पहिल्या टप्प्यात दिल्ली, चंदिगढ या भागात केळीचे घड पाठविण्यात आले. त्यानंतर हैदराबाद येथे केळीची विक्री झाली केळीचा दर्जा चांगला असल्यामुळे गोदा फार्मचे नागेश खांडरे, नितीन चव्हाण तसेच मुंबई येथील अधिकारी संजय काटकर यांच्या मदतीने केळीचे घड बाहेर देशात पाठविण्यासाठी गोरे यांनी प्रयत्न सुरू केले.

बांगलादेशामध्ये केळीची मागणी असल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील व्यापाऱ्यांशी संपर्क साधून अर्धापूर येथील केळीच्या दलालामार्फत बांगलादेशातील व्यापाऱ्यांशी संपर्क झाल्यानंतर केळीची सतरा टन वजनाची पहिली गाडी नुकतीच बांगलादेशला रवाना झाली आहे. सुमारे सोळाशे रुपये क्विंटल याप्रमाणे बांगलादेश येथे केळीचे घड विक्री करण्यात आल्याचे श्री. गोरे यांनी सांगितले. सुमारे पावने सहाशे झाडांची घडे बांगलादेशात रवाना झाली आहेत. विदेशात जाणाऱ्या या वाहनाचे पूजन करून वाहन रवाना करण्यात आले आहे.

गोरे यांच्या शेतातील आतापर्यंत सुमारे चार हजार झाडांची विक्री झाली असून त्यातून अंदाजे पंचेविस लाख रुपयांचे उत्पन्न झाल्याचे गोरे यांनी सांगितले. पुढील आठवड्यात दिल्ली येथील व्यापारी केली खरेदीसाठी येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उपलब्ध पाण्याचे काटकसरीने केलेले नियोजन तसेच बाजार भाव लक्षात घेऊन पिकांची विक्री केल्यास शेती मधूनही चांगले उत्पन्न मिळू शकते हे दिग्रस येथील शेतकरी गोरे यांनी दाखवून दिले आहे.

Web Title: digras banana directly in Bangladesh