कॉंग्रेस व नेत्यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांना जागा दाखवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

लातूर - शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष व कॉंग्रेस नेत्यांच्या नावांचा गैरवापर करून कोणी मते मागत असेल, तर अशांना शिक्षकांनी त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन आमदार दिलीपराव देशमुख यांनी केले.

लातूर - शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष व कॉंग्रेस नेत्यांच्या नावांचा गैरवापर करून कोणी मते मागत असेल, तर अशांना शिक्षकांनी त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन आमदार दिलीपराव देशमुख यांनी केले.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व विविध शिक्षक संघटनांचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (ता. 26) आयोजित शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर, माजी आमदार बाबासाहेब पाटील, वैजनाथ शिंदे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, बसवराज पाटील नागराळकर, संजय बनसोडे, डॉ. डी. एन. चिंते, मोईज काझी, मकरंद सावे, बबन भोसले, रामदास पवार, प्रा. गोविंद घार, डी. एन. केंद्रे, राजा मणियार, अण्णाराव चव्हाण व प्रा. शिवाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार देशमुख म्हणाले, "विरोधकांबद्दल अपप्रचार करण्यापेक्षा आपण किती आणि कोणते चांगले काम करतो, हे सांगणे गरजेचे असते. हेच विधायक काम विक्रम काळे सातत्याने करत आले आहेत. विधान परिषदेमध्ये इतर शिक्षक आमदारांपेक्षा शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विक्रम काळे हे शासनाला नेहमी धारेवर धरतात. ते शिक्षक आणि शिक्षण हिताच्या प्रश्नांसाठी आग्रही असतात, हे आम्ही जवळून पाहिले आहे. यामुळे विरोधकांच्या भूलथापांना थारा न देता विक्रम काळे यांना बहुमतांनी निवडून द्यावे.'

श्री. मुंडे म्हणाले, "विधान परिषदेत फक्त शिक्षकांच्या प्रश्नावर विक्रम काळे यांचा लढा असतो. यामुळेच त्यांना शिक्षकांची नेहमी नंबर एकची पसंती असते. या निवडणुकीतही शिक्षकांनी पहिली पसंती विक्रम काळे यांना द्यावी.' मेळाव्याला विविध शिक्षक व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: diliprao deshmukh speech for vikram kale publicity