लॉकडाउनमध्येही भाजीपाला विक्रीतून मिळविला थेट नफा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

कोणत्या शेतकऱ्याकडे किती व कोणता भाजीपाला, धान्य उपलब्ध आहे याची माहिती घेण्यात आली. त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे गट तयार करून शहरातील अनेक ग्रुपमध्ये माहिती देण्यात आली. त्‍यानंतर घरपोच भाजीपाला विक्री सुरू झाली. 

हिंगोली : लॉकडाउनच्या कालावधीत शेतकऱ्यांनी एकत्र येत ‘झेंडूची फुले अभियान’ व्हॉट्सॲपग्रुपच्या माध्यमातून भाजीपाला, केळी, टरबूज, खरबूज यासह धान्याची घरपोच विक्री केली. शेतकरी ते थेट ग्राहक असा व्यवहार झाल्याने दोघांनाही लाभ झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांपासून लॉकडाउन सुरू आहे. यात काही दिवस दिवसाआड, तर कधी चार ते पाच दिवसांनंतर भाजीपाल्याची विक्री होत होती. या कालावधीत घराबाहेर पडणेदेखील नागरिकांना अवघड जात होते. तसेच शेतकऱ्यांनादेखील भाजीपाला व फळे विक्री करण्यास अडचणी येत होत्या. 

हेही वाचाहिंगोलीत हळद अडीच हजारांनी उतरली

घरपोच भाजीपाला विक्रीचा निर्णय

यामुळे शेतातील भाजीपाला जागेवरच सुकून जात होता. झेंडूची फुले नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. अण्णा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी राजा कदम, संतोष टेकाळे, उमेश साबळे, धोंडदेव जाधव, अंगद जाधव, प्रमोद जाधव, प्रसाद पठाडे आदी शेतकऱ्यांनी घरपोच भाजीपाला व धान्य विक्री करण्याचा निर्णय घेतला. 

शेतकऱ्यांनी तयार केले गट 

कोणत्या शेतकऱ्याकडे किती व कोणता भाजीपाला, धान्य उपलब्ध आहे याची माहिती घेण्यात आली. त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे गट तयार करून शहरातील अनेक ग्रुपमध्ये माहिती देण्यात आली. त्‍यानंतर घरपोच भाजीपाला विक्री सुरू झाली. शेतातील ताजा भाजीपाला घरपोच मिळत असल्याने मागणी वाढली होती.

पंचवीस टन टरबुजांची विक्री

 दीड ते दोन महिन्यांत पाचशे ते सातशे जणांना घरपोच भाजीपाला उपलब्ध करून देण्यात आला. तसेच टरबूज, खरबूज, केळी, चिकू यासह गहू, ज्‍वारी, डाळी आदींची विक्री झाली. संतोष टेकाळे यांच्याकडे वांगे, टमाटे, भेंडी, चवळी, शेवगा, पालक, दिलपंसत, कोबी, कोथिंबीर, काकडी आदी भाजीपाला व धान्य होते. राजा कदम यांच्याकडे टरबूज, प्रसाद पठाडे यांच्याकडे केळी, टरबूज होते. श्री. पठाडे यांनी तीस टन केळी ; तर पंचवीस टन टरबुजांची विक्री केली. व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विक्रीचा फंडा वापरून शेतकऱ्यांनी लॉकडाउनच्या काळातही नफा मिळविला. 

येथे क्लिक करासंतापजनक : क्वारंटाइन गरोदर मातेसह मजुरांना मारहाण

सर्वांची साथ मिळाली

भाजीपाला उत्‍पादक शेतकऱ्यांशी चर्चा करीत असताना झेंडूची फुले नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून घरपोच भाजीपाला विक्रीचा पर्याय समोर आला. सर्वांची साथ मिळाल्याने भाजीपाल्याची विक्री झाली.
-गंगाराम टेकाळे, शेतकरी, ईडोळी.

 

व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विक्री

तीस टन केळी; तर पंचवीस टन टरबुजांची व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून लॉकडाउनच्या कालावधीत विक्री झाली. सुरवातीला केळीचे नुकसान झाले. मात्र, या ग्रुपमधून घेतलेल्या निर्णयामुळे विक्री झाल्याने समाधान मिळाले आहे.
-प्रसाद पठाडे, शेतकरी, हिंगोली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Direct Profits Were Made From The Sale Of Vegetables even in lockdown Hingoli News