नवजात अर्भकाच्या मातेचा अंबाजोगाईत शोध, अल्पवयीन मुलगी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील पी.जी हॉस्टेलच्या मागच्या बाजूस हे पुरुष जातीचे अर्भक सापडले होते. युवकांना रडण्याचा आवाज  आल्याने त्यांनी सुरक्षा रक्षकास यांची माहिती दिली.

अंबाजोगाई (जि.बीड) - स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात सापडलेल्या अर्भकाच्या मातेचा शोध पोलिसांनी ४८ तासात लावला. सदरील अल्पवयीन मातेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक सिध्दार्थ गाडे यांनी सांगितले.

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील पी.जी हॉस्टेलच्या मागच्या बाजूस शुक्रवारी (ता. आठ) हे पुरुष जातीचे अर्भक सापडले होते. परिसरातील युवकांना रडण्याचा आवाज  आल्याने त्यांनी सुरक्षा रक्षकास यांची माहिती दिली. सुरक्षारक्षकांनी या अर्भकास उपचारांसाठी तात्काळ रुग्णालयात दाखल  केले होते. त्यांच्याच तक्रारीवरून पोलिसांत अज्ञात मातेवर गुन्हा दाखल झाला होता.या घटनेचा पोलिस निरीक्षक सिध्दार्थ गाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास लावत त्या महिलेला शोधुन काढले. 

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...  

रुग्णालय अधीक्षकांच्या मदतीने माहिती घेऊन पोलिसांना त्या महिलेपर्यंत पोचता आले. सदरील मुलगी अल्पवयीन असून, ज्या दिवशी हे अर्भक सापडले त्याच दिवशी ती या रुग्णालयात प्रसुत झाली होती. त्याच दिवशी दुपारी साडेबारा वाजता तिने रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन हे मुल टाकून दिल्याची कबुलीही तिने पोलिसांना दिली. तिच्यासोबत तिला मदत करणाऱ्या एका महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षकांनी सांगितले. या मुलीशी संबंध आलेला तो युवक कोण याचाही पोलिस तपास घेत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Discovery of the mother of a newborn baby in Ambajogai

Tags
टॉपिकस
Topic Tags: