
वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील हरभरा पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने मोठ्या मेहनतीने वाढविलेल्या हरभऱ्याच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उमरगा (जि.उस्मानाबाद) : वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामातील हरभरा पिकावर घाटी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने मोठ्या मेहनतीने वाढविलेल्या हरभऱ्याच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाचा रब्बी हंगामातील पेरणी उशीरा झाल्याने शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे क्षेत्र वाढवले आहे. पिकाच्या निगराणीसाठी मेहनत घ्यावी लागत असताना अळ्यांचे विघ्न सुरू झाल्याने शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी पदरमोड करावी लागत आहे.
दरम्यान कृषी कार्यालयाच्या वतीने अळींचा प्रादूर्भाव वेळीच रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. हरभरा व ज्वारी पिकावर कामगंध सापळा लावून नर पतंगाना सापळ्यात ओढण्याचा प्रयोग राबविला जात आहे. या माध्यमातून अळ्यांचे प्रमाण व त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आखल्या जात आहे. तालुक्यात खरीप हंगामातील पिकांचे उत्पन्न सर्वाधिक क्षेत्रावर घेतले जाते. यंदाचा खरिप हंगाम शेतकऱ्यांना फारसा दिलासदायक ठरला नाही. शेवटच्या टप्प्यात अतिवृष्टी झाल्याने रब्बीच्या पेरण्याला उशीर झाला. ज्वारीचे क्षेत्र कमी तर हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे.
बऱ्याच भागात पाण्याची उपलब्धता असल्याने भारनियमनच्या वेळेनुसार दिवसा, रात्री पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी मेहनत घेताहेत. आता शिवार हिरवाईने बहरले जात असताना अधूनमधून ढगाळ वातावरणामुळे हरभरा, ज्वारी व मक्यावर आळीचा प्रार्दुभाव सुरु झाला आहे. गेल्या तीन दिवसापासून तालुक्यात ढगाळ स्थिती असल्याने अळ्यांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. हरभरा पिकावर घाटे अळीचा तर ज्वारीवर लष्करी अळींचा प्रादूर्भाव सुरू झाला आहे. अळींची प्राथमिक स्थिती पाहुन शेतकऱ्यांनी महागड्या औषधांची फवारणीचे नियोजन सुरू केले आहे.
अळ्यांच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाचे प्रयोग
यंदा पेरणीला उशीर झाल्याने शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे क्षेत्र वाढवले आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून बऱ्याच ठिकाणी घाटे अळीचा प्रार्दुभाव सुरू झाला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरु केले असून मुरूमचे मंडळ कृषी अधिकारी एस. बी. खंडागळे, कृषी सहायक यांनी हरभऱ्यावरील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी सात गावात फेरोमन ट्रॅप लावले आहेत. दरम्यान तालुक्यात कृषी विभागाने हरभरा पिकासाठी १९ तर ज्वारीसाठी २० गावांत फेरोमन ट्रॅप लावण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुनिल जाधव यांनी सांगितली.
असे असते कामगंध सापळ्याचे नियोजन
पिकावरील अळ्याची सुरुवात, त्याचे प्रमाण समजण्यासाठी नर पतंगावर फेरोमन ट्रॅप (कामगंध सापळे) लावले जातात. हरभरा पिकावरील घाटे अळींच्या निर्मितीचे नैसर्गिक चार टप्पे आहेत. नर - मादीच्या मिलनातुन अंडी तयार होते. त्यानंतर अळी आठ ते दहा दिवसांच्या आयुष्यात पिकांचे नुकसान करते आणि त्यानंतर ती कोष तयार करते. कोषातुन नर व मादी पतंग तयार होतो. कामगंध सापळ्याच्या माध्यमातुन नर पतंगावर ट्रॅप लावला जातो.प्लास्टिकच्या सापळ्यात असलेल्या विशिष्ट पद्धतीच्या गोळी मादी पतंगाचा वास असतो. या वासाने नर पतंग त्याकडे आकृष्ठ होतो आणि तो सापळ्यात अडकतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या होणाऱ्या नर- मादी मिलनातुन होणारी उत्पत्ती कमी होऊ शकते आणि त्यातून नुकसानीची पातळी लक्षात येते.
यंदा हरभऱ्याचा पेरा अधिक आहे. हरभरा पिकावरील घाटे अळीचे प्रमाण किती, त्यानंतर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनासंदर्भातील अंदाज घेण्यासाठी कामगंध सापळा प्रकल्प जात आहे. सापळ्यात सात पेक्षा अधिक पतंग अडकले तर अळींचे प्रमाण वाढले असे समजावे. त्यानंतर अधिक प्रादुर्भाव रोखण्यासाठी निंबोळी अर्क किंवा क्वीनोलपोस (२० टक्के) २० मिली प्रतिदहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी जेणेकरुन अळ्या नष्ट होतील.
- एस. बी. खंडागळे, मंडळ कृषी अधिकारी
संपादन - गणेश पिटेकर