खड्ड्यांमुळे वाढल्या मणक्यांच्या व्याधी

Nanded News
Nanded News

नांदेड : पावसाळा संपला तरीही शहरातील अंतगर्त आणि रहदारीच्या प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. अनेक रस्त्यांवर एक फूट खोलीपर्यंतचे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांच्या दणक्यांमुळे नांदेडकरांना अनेक आजार आणि वाहन दुरुस्ती भुर्दंडासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना मणके, कंबर, मान आणि पाठीच्या दुखण्याने ग्रासले असल्याची धक्कादायक बाब आता डाॅक्टरांच्या सांगण्यातून समोर आली आहे.  
शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची नागरिकांकडून वेळोवेळी मागणी होते. मात्र खड्ड्यांची दुरुस्ती होताना दिसत नाही अन् खड्ड्यांची संख्याही कमी होत नाही. दुरुस्ती केली तरी ती थातूरमातूर ठिगळ लावले जाते. हे ठिगळ एक दोन दिवसातच निघून तेथे पुन्हा खड्डा तयार होतो. भ्रष्ट प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे नांदेडकरांना शारीरिक, मानसिक तसेच आर्थित त्रास सहन करून नांदेडकरांना दिवस काढल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

जबाबदारीकडे सर्वांनीच केला कानाडोळा

शहरवासियांना दर्जेदार सुविधा देणे, ही महापालिकेतील नगरसेवक, पदाधिकारी आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु, या जबाबदारीकडे सर्वांनीच कानाडोळा केला आहे. अशा परिस्थितीत नांदेडकरांनी दाद मागावी तरी कोणाकडे, अशी परिस्थिती निर्माइ झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था तर झालेलीच आहे; त्याहीपेक्षा गल्लीबोळांतील रस्त्यांची तर अक्षरशः चाळणी झालेली आहे. त्यामुळे लहान-मोठे अपघात रोजच होत आहेत. शहरातील कित्येक रस्ते नळाचे पाईप, सांडपाण्यासाठी नाली, केबल टाकण्यासाठी खोदण्यात आलेले आहेत. मात्र अनेक ठिकाणी कामे अद्यापही अर्धवट स्थितीतच आहेत. एकतर हे खड्डे ओळखू येत नाहीत, त्यातही वाहन जोरात आदळल्यामुळे पडण्याचाही धोका असतो. 

नांदेडकर हैराण

खोदलेल्या रस्त्यांमुळे शहरात सर्वत्र धुळीचे, कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होऊन प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. वाहनचालकांच्या नाका-तोंडात आणि डोळ्यांत धूळ जात असल्याने दुचाकी वाहन चालवणे कठीण झाले आहे. परिणामी डोळ्यांचे आजार आणि खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे वाहनांचे नुकसान आणि शारीरिक आजार अशा दोन्ही संकटांना सद्यस्थितीत नांदेडकर हैराण झालेले आहेत. असे असतानाही संबंधित अधिकारी मात्र कुंभकर्णी झोपेतच राहून कारभार हाकत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.
 

स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी

खड्ड्यांमुळे मणक्यांतील गादी सरकून कंबरदुखी, माकडहाड सरकून पाठदुखीची समस्या, वाहनांच्या दणक्यांमुळे दोन मणक्यांमध्ये फट, वृद्ध व्यक्तींना पाठ व मानदुखीचा त्रास, वाहनाला बसणाऱ्या दणक्यांमुळे मान दुखणे, हात आणि खांदेदुखीचा त्रास, धुळीमुळे श्वसनाचा त्रास आणि डोळ्यांचीही जळजळ होते.  त्यामुळे नागरिकांनी मर्यादीत वेगातच गाडी चालवावी. तसेच हेल्मेटसह नाकाला मास्क किंवा रुमाला बांधूनच वाहन चालवून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
- डाॅ. आशीष सोनपलवाड


 रोजच संघर्ष
नांदेडकरांना बेशिस्त वाहतुक व्यवस्थेसोबतच जागोजागी पडलेल्या खड्ड्यांशी रोजच संघर्ष करावा लागत आहे. वाहनांच्या सस्पेन्शनचे आयुष्य साधारणपणे ३५ ते ४० हजार किलोमिटर असते. परंतु, शहरातील खड्ड्यांमुळे गाडीचे सस्पेन्शन लवकर खराब होत आहे. एखाद्या चारचाकी वाहनाच्या सस्पेन्शनचे काम करावयाचे झाल्यास २० ते २५ हजारांपर्यंत खर्च येतो. इंजिन, डॅमेज, आॅईलपंप तुटणे, गाडीचे हॅंडल बाॅलसेट किंवा चाकाचे बेअरिंग खराब होणे हे खड्ड्यांमुळे नित्याचेच झाले आहे.
- विजय हाटकर, छत्रपतीनगर नांदेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com