जिल्ह्यात 27 हजार महिलांना मिळणार घरपोच गॅस कनेक्‍शन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

साधारणतः साडेचार ते पाच हजार रुपयांत मिळणारे गॅस कनेक्‍शन उज्ज्वला योजनेअंतर्गत 1715 रुपयांत शेगडी, रेग्युलेटर व गॅस सिलिंडरसह मिळणार आहे. त्यामुळे महिलांनी चुलींचा वापर सोडावा. 
- प्रीती जैन, एलपीजी गॅस वितरण अधिकारी, भारत पेट्रोलियम 

औरंगाबाद - पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दारिद्य्ररेषेखालील 27 हजार महिलांना गॅस वाटपाच्या उपक्रमाची सुरवात मंगळवारी (ता. तीन) मौलाना आझाद संशोधन केंद्रातील कार्यक्रमात करण्यात आली. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात 21 महिलांना गॅस कनेक्‍शनच्या कागदपत्रांचे वितरण करण्यात आले. 

पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यातून 37 हजार अर्ज प्राप्त झाले होते, यापैकी 27 हजार अर्ज वैध ठरले असून, पहिल्या टप्प्यात 11 हजार लाभार्थ्यांना गॅस कनेक्‍शन देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे उद्‌घाटन मंगळवारी (ता. तीन) खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात कनेक्‍शनची कागदपत्रे वाटप करण्यात आले. 

जिल्ह्यातील 48 गॅस वितरकांच्या माध्यमातून घरपोच कनेक्‍शन वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये गॅसधारकांना सहा लाखांपर्यंतचा अपघात विमा मोफत मिळणार आहे. या वेळी हिंदुस्तान पेट्रोलियमचे एलपीजी गॅस वितरण अधिकारी आशिष गुथालियान, इंडियन ऑईलचे एलपीजी गॅस वितरण अधिकारी वैशाली अरोरा व नरेंद्र बुलडक यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, ऍड. अशोक पटवर्धन, ऍड. आशुतोष डंख, महापालिकेच्या आरोग्यसभापती मीना गायके, किशोर नागरे, शेख रब्बानी, गॅस एजन्सीचालक दीपक व्यास, मिथुन व्यास, जितू कक्कर, मंगेश आस्वार, संजय जोगदंड, श्रीकांत जाधव, निखिल मोदी, भास्कर केदारे, नारायण खडके आदी उपस्थित होते. 

Web Title: District 27 thousand women will get delivery gas connection