जिल्हा क्रीडा कार्यालयात अग्निशामक यंत्रणाच नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

औरंगाबाद - शहरात आगीच्या घटना घडत असताना जिल्हा क्रीडा कार्यालयात मात्र आग विझवणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. विभागीय क्रीडा संकुलातील यंत्रणा ऑगस्ट 2016 मध्ये बाद झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि भारतीय खेळ प्राधिकरणामधील आग विझविणाऱ्या यंत्रणा या नव्याने बसवण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद - शहरात आगीच्या घटना घडत असताना जिल्हा क्रीडा कार्यालयात मात्र आग विझवणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. विभागीय क्रीडा संकुलातील यंत्रणा ऑगस्ट 2016 मध्ये बाद झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि भारतीय खेळ प्राधिकरणामधील आग विझविणाऱ्या यंत्रणा या नव्याने बसवण्यात आल्या आहेत.

जागेअभावी आमखास मैदानाहून विभागीय क्रीडा संकुलात स्थलांतरित झालेल्या जिल्हा क्रीडा कार्यालयास मुबलक जागा मिळाली. मात्र शहरात आगीने तांडव केल्यानंतरही या कार्यालयात फायर एक्‍सटिंग्विशर लावण्यात आलेले नाहीत. आग लागल्यास त्यापासून बचाव करण्यासाठी या कार्यालयात कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. या कार्यालयात कागदांचा मोठा साठा आहे. या रेकॉर्डमुळे जागा पुरत नसल्याने विभागीय क्रीडा संकुलात या कार्यालयास हलवण्याची मागणी करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांच्या पुढाकाराने हा निर्णय झाला असला तरी त्याच्या सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना या कार्यालयात करण्यात आलेल्या नाहीत. जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे यांनी याबाबत कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे सांगितले. जिल्हा क्रीडा परिषदेच्या बैठकीत त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने मांडणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे यांनी सांगितले.

विभागीय क्रीडा संकुलात अनेक ज्वलनशील गोष्टी आहेत. यात साउंड अब्सॉर्बर्स, बॅडमिंटन हॉलमधील लाकडी तळ, छताला असलेले पडदे आदींचा समावेश आहे. त्यासाठी लावण्यात आलेल्या फायर एक्‍सटिंग्विशर्सच्या पुनःतपासणीची तारीख 12 ऑगस्ट 2016 ही या सिलिंडरवर नमूद करण्यात आली आहे. मात्र ही तारीख उलटून चार महिने होत असले तरी त्यांची पुनःतपासणी किंवा फेरभरण करण्यात आलेले नाही. विभागीय क्रीडा संकुलाचे उपसंचालक राजकुमार महादावाड यांनी सांगितले की, या कामासाठीची कारवाई सुरू असून पंधरा दिवसात ते पूर्ण करण्यात येणार आहे.

खेळ प्राधिकरण, विद्यापीठ अप-टू-डेट
भारतीय खेळ प्राधिकरणमधील फायर एक्‍सटिंग्विशर्स तीन महिन्यापूर्वी बदलण्यात आले असून त्यासाठीची रंगीत तालीमही करण्यात आली आहे. आगीचा संभाव्य धोका लक्षात घेता हे करण्यात आले असल्याची माहिती केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी दिली. हे एक्‍सटिंग्विशर्स वापरता यावेत यासाठी कर्मचाऱ्यांसह आपणही प्रशिक्षण घेतले असल्याचे ते म्हणाले.

Web Title: District Sports Office no fire system