जिल्ह्यात 35 हजार हेक्‍टरवर होणार उसाची लागवड 

जिल्ह्यात 35 हजार हेक्‍टरवर होणार उसाची लागवड 

बीड - चार वर्षांच्या दुष्काळी स्थितीनंतर मागील वर्षी झालेल्या दमदार पावसाने घटलेल्या उसाच्या क्षेत्रात यावर्षी मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी वार्षिक सरासरीपेक्षाही जास्त म्हणजेच 125 टक्के इतका पाऊस झाल्याने व जिल्ह्यातील बहुतांश तलाव तुडुंब भरल्यामुळे शेतीसाठी संरक्षित पाणीसाठा उपलब्ध झाल्याने यावर्षी जिल्ह्यातील ऊसक्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली आहे. 

आतापर्यंत 32 हजार हेक्‍टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली असून अद्यापही काही ठिकाणी ऊसलागवड सुरू असल्याने यंदा 35 हजार हेक्‍टरवर ऊसलागवड होणार असल्याचा अंदाज कृषी उपसंचालक बी. एम. गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. 

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण घटल्याने जिल्ह्याला सलग चार वर्षे दुष्काळाला सामोरे जावे लागले. यामुळे पीकपद्धतीमध्ये बदल नोंदविला गेला असून जास्त प्रमाणात पाणी आवश्‍यक असणाऱ्या पिकांचा पेरा घटल्याचे समोर आले आहे. ऊस या पिकाला मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. त्यातच जिल्ह्यात पाणीबचतीबाबत फारशी जागृती झाली नसल्याने जिल्ह्यात उसाला भरपूर पाणी सोडण्यात येते. उसासाठी अत्यल्प प्रमाणात ठिबकचा वापर केला जातो. त्यातच गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने ऊसक्षेत्रात मोठी घट नोंदविण्यात आली होती. मात्र गतवर्षी वार्षिक सरासरीपेक्षाही जास्त पाऊस झाल्याने भूजलपातळीत वाढ झाली. याशिवाय जिल्ह्यातील तलाव तुडुंब भरल्याने यावर्षी शेतकरी ऊसलागवडीकडे वळले आहेत. संरक्षित पाणीसाठा उपलब्ध असणारे शेतकरी कापसाऐवजी आता उसाला प्राधान्य देत आहेत. 

आतापर्यंत जिल्ह्यात आडसाली ऊसक्षेत्र 244 हेक्‍टर, पूर्वहंगामी ऊसक्षेत्र 7 हजार 853 हेक्‍टर, खोडवा उसाचे क्षेत्र 3 हजार 901 हेक्‍टर तर नव्याने ऊसलागवड झालेले क्षेत्र 20 हजार हेक्‍टरच्या घरात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 32 हजार हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली असून फेब्रुवारी महिन्यानंतर उसाची लागवड केली जाऊ नये, असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी अद्यापही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड सुरू असल्याने जवळपास 35 हजार हेक्‍टरवर उसाची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये झालेल्या ऊसलागवडीपेक्षा यावर्षी जास्त क्षेत्रावर ऊसलागवड होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

उसासाठी ठिबकचा वापर व्हावा 
गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण घटल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके बसले आहेत. आता बऱ्यापैकी पाऊस झाला असला, तरी मागच्या अनुभवावरून शेतीसाठी होणाऱ्या पाणीवापरामध्ये बचत व्हावी, या दृष्टीने ऊस पिकासाठी सऱ्यांमध्ये पाणी सोडण्याऐवजी उसाकरिता ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचा वापर शेतकऱ्यांनी करायला हवा. याद्वारे पिकाला आवश्‍यक प्रमाणात पाणी मिळते. शिवाय पाण्याची बचत होत असल्याने भूजल पातळीही टिकून राहते. 
बी. एम. गायकवाड, कृषी उपसंचालक 

वर्षनिहाय ऊसलागवडीचा तपशील 
वर्ष-ऊसलागवड क्षेत्र (आकडे हेक्‍टरमध्ये)- 
2007-08-74000- 
2008-09-44400- 
2009-10-43200- 
2010-11-58800- 
2011-12-53600- 
2012-13-52100- 
2013-14-28307- 
2014-15-35187- 
2015-16-12293- 
2016-17-12293- 
2017-18-35000-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com