दोन हजार २०० पोषण परसबागा साकारणार हा जिल्हा..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

हिंगोली जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत माझी पोषण परसबाग मोहिमेचे अभियान राबविण्यात येत आहे. राज्यात हिंगोली चौथ्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली. 

हिंगोली ः महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत २५ जून ते १५ जुलै या कालावधीत माझी पोषण परसबाग मोहिमेचे अभियान राबविण्यात येत आहे. यात उमेद अभियानातून जिल्ह्यात दोन हजार २०० पोषण परसबागा साकारणार असल्याने राज्यात हिंगोली जिल्ह्याने चौथ्या क्रमांकावर मजल मारल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक धनवंतकुमार माळी यांनी दिली. 

उमेद अभियानांतर्गत सध्या सहा हजार आठशे ३७ महिला समूह काम करीत असून ६८ हजार ३७० कुटुंब सहभागी झाले आहेत. ज्या समूहातील महिलांकडे घराशेजारी व शेतातील उपलब्ध जागेत सात लाख दहा हजार परसबागा साकारणार आहेत. जिल्ह्यात २५ जून ते १५ जुलै अखेर एक हजार ५१० परसबागा विकसित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे माळी यांनी सांगितले. 

हेही वाचा - प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना पोलिस कोठडी

आरोग्याची काळजी म्हणून कृती संकल्प अभियान 
माझी पोषण परसबाग मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबिनोद शर्मा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक धनवंतकुमार माळी, उमेद अभियानाचे व्यवस्थापक जयराम मोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आरोग्याची काळजी म्हणून कृती संकल्प अभियान अंतर्गत अन्न, आरोग्य, पोषण व स्वछता, विषयक उद्देश डोळ्यासमोर ठेऊन आर्थिक वर्षात महिलांना व कुटुंबातील व्यक्तीस पोषक आहार उपलब्ध व्हावा व त्यातून त्यांचे आरोग्य सुधारावे याकरिता पोषण परसबागातून सकस आहार घेण्यासाठी उपयोगी ठरणार आहेत. स्वयंसहायता समूहातील सदस्यांच्या पोषणाची व आरोग्याची स्थिती चांगली राहावी, लहान मुले, किशोर वयीन मुली, स्तनदा माता, गर्भवती महिला यांना ताजा व सकस आहार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

पाच तालुक्यात जवळपास ९०८ परसबागेची निर्मिती
आतापर्यंत हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, औंढा, वसमत या पाचही तालुक्यात जवळपास ९०८ परसबागेची निर्मिती केली आहे. मोहिमेत हिंगोली जिल्ह्याने राज्यात चौथ्या क्रमांकावर मजल मारल्याचे सांगून पुढे ते म्हणाले, परसबागेतील आतल्या सात वाफ्यात पालेभाज्या तर बाहेरील सात वाफ्यात फळबागा लागवड केली जाणार आहे. याबाबत महिलांना कृषी विभागाकडून प्रशिक्षणही दिले आहे. हा भाजीपाला सेंद्रिय असल्याने महिलांच्या संपूर्ण कुटुंबातील आरोग्य ही निरोगी राहण्यास मदत मिळणार असल्याचे माळी यांनी सांगितले. 

अधिकाऱ्यांनी केली पाहणी 
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक धनवंतकुमार माळी यांनी तालुक्यातील माळहिवरा व अन्य गावाना बुधवारी भेटी देऊन परसबागेची पाहणी केली. तसेच परस बागे संदर्भात संबंधित गटाशी संवाद साधून येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी त्यांच्यासोबत विस्तार अधिकारी विष्णू भोजे उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This district will have 2,200 nutritious kitchen gardens., hingoli news